औरंगाबाद : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र शासकीय महिला व नवजात शिशू रुग्णालय कार्यरत असून, औरंगाबाद जिल्हा मात्र त्याला अपवादच आहे. महिला रुग्णालयाच्या उभारणीकडे शासनाने पार दुर्लक्ष केले आहे. परिणामी, वर्षानुवर्षे महिला आरोग्याची भिस्त केवळ घाटी रुग्णालयावरच आहे.
चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबर २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयास मंजुरी मिळाली; परंतु जागेअभावी या रुग्णालयाच्या उभारणीला काही केल्या मुहूर्त मिळाला नाही. वर्षानुवर्षे जागेचा नुसता शोध सुरूहोता. अखेर या रुग्णालयासाठी गतवर्षी सप्टेंबरमध्ये दूध डेअरीची २१ हजार ८५३ चौ.मी. जागा देण्यात आली आहे. एकीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयाला २०१० मध्ये मान्यता मिळाली; परंतु अद्यापही हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही, तर दुसरीकडे जिल्ह्याचे महिला रुग्णालय अजूनही कागदावरच आहे.
रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यात आला; परंतु निधीअभावी रुग्णालयाची उभारणी रेंगाळली आहे. जवळपास ३०० कोटींचा निधी या रुग्णालयाच्या उभारणीसाठी लागणार आहे. नियोजित महिला व नवजात शिशू रुग्णालयामध्ये महिलांवर सर्व प्रकारचे मूलभूत उपचार व शस्त्रक्रिया होणार आहेत. नैसर्गिक प्रसूतीसह सिझेरियन शस्त्रक्रिया, महिलांमधील विविध प्रकारच्या कर्करोगाच्या चाचण्या, उपचार व शस्त्रक्रिया, गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया, स्तनाच्या कर्करोगाची मॅमोग्राफी तपासणी, इतर शस्त्रक्रिया रुग्णालयामध्ये होणार आहेत. सोबतच कमी वजनाच्या नवजात शिशूंवर याठिकाणी उपचार केले जातील. आजघडीला या सगळ्या उपचारासाठी घाटी रुग्णालयावर प्रचंड भार आहे. त्यामुळे महिला रुग्णालय कधी सुरू होते, याकडे लक्ष लागले आहे; परंतु शासनाबरोबर लोकप्रतिनिधी, स्थानिक नेत्यांकडूनही फारसा प्रयत्न होताना दिसत नाही.
असे राहील रुग्णालयदूध डेअरीच्या जागेत तळमजल्यासह चार मजले अशी या रुग्णालयाची इमारत प्रस्तावित करण्यात आली आहे. याबरोबरच जिल्हा शल्यचिकित्सकांचा बंगला, वर्ग १ व २ कर्मचाऱ्यांची १२ निवासस्थाने, वर्ग-३ कर्मचाऱ्यांसाठी ६० निवासस्थाने, वर्ग-४ कर्मचाऱ्यांसाठी २४ निवासस्थाने असे नियोजन करण्यात आले आहे.
निधी मिळताच काममहिला रुग्णालयाचा प्रारूप आराखडा मंजूर झालेला आहे. प्रकल्प किंमत (बजेट इस्टिमेट) मंजुरीसाठी शासनाक डे पाठविण्यात आलेले आहे. निधी मिळताच रुग्णालयाचे काम सुरू होईल.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक