ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 11 - समर्थनगर परिसरात फिरायला जाणा-या एकट्या महिलांच्या अंगावर थुंकणार आणि त्यांना चापटा मारून पळणा-या माथेफिरूला पकडण्यात पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. समर्थनगगर- भोईवाडा नाल्यावरील एका छोट्या पुलावर आरोपीला शनिवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली. या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तक्रारदार महिलांनीही त्यास ओळखले आहे.
शेख अमिनोद्दीन शेख नुरोद्दीन असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समर्थनगर भागात वर्षभरापासून एका माथेफीरु दुचाकीस्वाराने सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणा-या महिलांमध्ये दहशत पसरवली होती. चाळीशी ओलांडलेल्या महिलांच्या पाठीमागून थापड मारून सुसाट वेगात निघून जात तर कधी तो समोरून चक्क थुंकत असे.
त्याच्या या विचित्र वागण्यामुळे महिला प्रचंड त्रस्त झाल्या होत्या. आतापर्यंत त्याने सुमारे २० ते २५ महिलांना लक्ष्य केले होते. याविषयी परिसरातील महिलांनी क्रांतीचौक पोलिसांकडे दोन महिन्यापूर्वी तोंडी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली होती. परंतु आरोपी हाती लागला नव्हता. मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून आरोपीचा त्रास वाढल्याने महिलांनी पुन्हा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरूळे यांच्याकडे एक अर्ज दिला होता.
एवढेच नव्हे तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन याविषयी कारवाई करण्याची विनंती केली होती. आयुक्तांनी याप्रकरणणी गुन्हेशाखा, दामिनी पथक आणि क्रांतीचौक पोलिसांना आरोपीचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे आदेश दिले. गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव, सहायक उपनिरीक्षक नसीम खान कर्मचारी बबन इप्पर, प्रमोद देवकत्ते, संदीप आणि राठोड, क्रांतीचौक पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाचे कर्मचारी गजानन मांटे आणि कर्मचारी हे साध्यावेशात शनिवारी सकाळी गस्तीवर होते
दुचाकीचे मॉडेल आणि आरोपीचे वर्णनाची झाली मदत
लाल पट्टे असलेले जॅकेट आणि पायात पांढरी चप्पल तसेच त्याच्याकडील मोटारसायकलचे मॉडेल जुने असून दुचाकीला स्टीलची डिग्गी असल्याचे महिलांनी सांगितले होते. शिवाय तो सीसीटिव्हीमध्येही कैद झाला होता. आज सकाळी तो भोईवाड्यातून समर्थनगरकडे दुचाकीने येत असताना नाल्यावरील लहानपुलावर तो पोलिसांच्या हाती लागला. प्रथम त्याची घरझडती पोलिसांनी घेतली असता तेथे पांढरी चप्पल आणि लाल पट्ट्याचे जॅकेट पोलिसांना मिळाले. तसेच त्याने गुन्ह्याची कबुलीही दिल्याचे पो.उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले.