वाळूज महानगर: जोगेश्वरी परिसरातील परदेशवाडी तलावात सोमवारी अनोळखी महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तलावात आत्महत्येसाठी जात असलेल्या या महिलेला वाचविण्यासाठी एका शेतकऱ्याने शर्थीने प्रयत्न केले. मात्र, महिलेने तलावातील खोल पाण्यात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.
जोगेश्वरी येथील सब्जर असगर पठाण (३०) हा सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कमळापूर शिवारातील शेतात जनावारांना चारा आणण्यासाठी गेला होता. दरम्यान, जवळपास ३० वर्षे वयाची अनोळखी महिला परदेशवाडी तलावाकडे जात असल्याचे त्याला दिसले. त्यामुळे त्याने तिला विचारणा करत रस्त्यात थांबविले. मात्र, ती महिला तेथून वेगाने तलावाच्या दिशेने निघून गेली. तिला वाचविण्यासाठी आसपास कुणीही नसल्यामुळे घाबरलेल्या सब्जर पठाणने पोलीस नियंत्रण कक्ष व गावातील नागरिकांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली.
एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश गंभीरराव, पोहेकॉ.वसंत जिवडे आदींच्या पथकाने घटनास्थळ गाठुन या महिलेचा शोध घेण्यास सुरवात केली. दरम्यान, याची माहिती मिळताच जोगेश्वरी, कमळापूर, रामराई आदी भागांतील नागरिकांनी घटनास्थळ गाठत तलावात शोध मोहीम राबविली.
मात्र, तलावात जास्त पाणी असल्यामुळे उपनिरीक्षक गंभीरराव यांनी वाळूज अग्निशामक दलाची तसेच स्थानिक मच्छिमारांची मदत घेतली. दुपारी एक वाजेच्या सुमारास तलावातून या महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. या महिलेचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. महिलेची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकलेली नव्हती. या अनोळखी महिलेविषयी कुणाला काही माहिती असल्यास एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.