वाळूज महानगर : पंढरपुरातून दोन मुलांसह एक ४५ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. रूपाली राजेश सिंग (४५, रा.पंढरपूर) ही महिला शनिवारी मुलगी अश्विनी (८) व मुलगा आशिष (५) या दोघांना सोबत घेऊन घरातून निघून गेली. सर्वत्र शोध घेऊनही हे तिघे कोठेही मिळून न आल्याने विजय सिंग याने सावत्र आई व सावत्र भावंडे बेपत्ता झाल्याची तक्रार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात दिली आहे.
----------------------
पेट्रोल पंप बंदमुळे वाहनधारक त्रस्त
वाळूज महानगर : कोरोनाच्या संसर्गामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आल्याने उद्योगनगरीतील वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. प्रशासनाच्या वतीने पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे या परिसरातील सर्वत्र पेट्रोल पंप बंद होते. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध करून देण्यात आले. या निर्णयामुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
----------------------
पाटोदा रस्त्यावर खड्डे
वाळूज महानगर : पंढरपूर ते पाटोदा या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना आदळआपटीचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी वाहनधारकांना रस्त्यावरील खड्डे दिसत नसल्याने ये-जा करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांना बजाजगेटमार्गे वळसा टाकून ये-जा करावी लागत आहे.
---------------------
कमळापूर फाट्यावर सांडपाणी
वाळूज महानगर : रांजणगावातील कमळापूर फाट्यावर सर्रासपणे सांडपाणी वाहत असल्याने पादचारी व वाहनधारकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्त्यावर अनेक जण सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे ठिकठिकाणी ते साचत आहे. या सांडपाण्यातून दुर्गंधीचा त्रास सहन करीत नागरिक व वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागत आहे.
-----------------------