औरंगाबाद: लॉकडाऊनमुळे खानावळीचा व्यवसाय ठप्प झालेल्या महिलेला सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सातारा परिसरातील निर्जनस्थळी नेऊन कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला. जानेवारी महिन्यात रात्री ८ वाजता ही घटना घडली. आरोपीने पीडितेला धमकी दिल्याने ती तक्रार देऊ शकली नव्हती. ओळखीच्या महिलेने धीर दिल्याने १३ जुलै रोजी तिने सातारा ठाणे गाठून गुन्हा नोंदविला.
अरुण अग्रवाल (रा. जालना) असे गुन्हा नोंद झालेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील पीडिता खानावळ चालविते. आरोपी अरुण हा दोन वर्षापासून तेथे जेवायला येत होता. लॉकडाऊनमुळे खानावळ बंद झाल्याने ती घरातून जेवणाचा डबा देत असे. लॉकडाऊनमुळे व्यवसायावर परिणाम झाला. यापुढे खानावळ पूर्वीसारखी सुरू होईल, हे सांगता येत नाही. मी तुम्हाला जालना जिल्हा परिषद अथवा औरंगाबाद महापालिकेत नोकरीस लावून देतो, असे आरोपी अग्रवाल याने तिला सांगितले. सरकारी नोकरी लागल्यावर तुझ्या मुलांचे भविष्य चांगले होईल, असेही तो म्हणाला. त्याच्या बोलण्यावर पीडितेचा विश्वास बसला होता.
जानेवारी महिन्यात तो तिच्या घरी कार घेऊन गेला. तुमच्या नोकरीसाठी आपल्याला एका साहेबांना भेटायला जायचे आहे, असा बहाणा त्याने केला. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला त्याच्यासोबत कारमध्ये गेली. तो त्यांना घेऊन बीड बायपास परिसरातील एमआयटी कॉलेजजवळ गेला. रात्रीचे सुमारे ८ वाजले असतील. त्याने कुणाला तरी कॉल केला आणि आम्ही एमआयटी कॉलेजजवळ येऊन थांबलो आहे, तुमची वाट पाहत आहे, असे म्हणून त्याने फोन ठेवला. साहेबांना यायला उशीर होईल, तोपर्यंत कुठेतरी थांबू असे म्हणून तो कार घेऊन परिसरातील निर्जनस्थळी गेला. तेथे त्याने कारमध्येच दारू पिऊन शरीरसंबंधाची मागणी केली. त्यास नकार दिल्यावर त्याने बळजबरी अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले. यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी देत कारमधून ढकलून दिले आणि तो कार घेऊन तेथून निघून गेला.
...अखेर पोलिसात तक्रारआरोपीने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडितेची पोलिसात तक्रार देण्याची हिंमत झाली नाही, शिवाय तेव्हापासून तो तिला भेटला नाही. काही दिवसापूर्वी त्याने नोकरीचे काम करणार आहे, असा निरोप त्याच्या मित्रांमार्फत तिला पाठविला. पोलिसात तक्रार केली तर नोकरीचे काम करणार नाही, असा दम भरला. दरम्यान, तिच्या खानावळीत काम करणाऱ्या महिलेला हा प्रकार सांगितल्यावर तीने धीर दिल्याने पोलिसात तक्रार नोंदविली.