ऑनलाईन लोकमत
औरंगाबाद: एका ९३ वर्षीय वृद्धाला तोंड ओळख झालेल्या महिलेने तुम्हाला पाहुण्यांचे शेत दाखवते अशी थाप मारत पैठण रोडवरील एका मंदीरात नेऊन जीवे मारण्याची धमकी देत लुटले. यावेळी नागरिकांनी प्रसंगवधान दाखवत दयाबाई सुरेश मगरे या महिलेस पकडले व तिला पोलिसांच्या स्वाधीन केले.
याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, सांडू सिरसाठ हे ९३ वर्षीय वृद्ध सिल्लोड तालुक्यातील रहिमाबादेतील रहिवासी आहेत. सध्या ते हडको एन-११ येथे नातेवाईकाकडे राहतात. रविवारी (दि.२३) सकाळी १० च्या दरम्यान ते सुदर्शननगर येथील बाळासाहेब ठाकरे उद्यानात फिरायला गेले. तेथे दयाबाई मगरे त्यांच्याशी साधेपणाने गप्पामारू लागल्या, नातीच्या वयाची महिला असल्याने सिरसाठ हे तिच्याशी बोले. यावेळी मगरे यांनी त्यांना चहा पिण्यासाठी तिच्या घरी रिक्षातून नेले. तेथे तुम्हाला माझ्या मुलीचे शेत दाखविते आणि पाहुण्यांना भेटून येऊ, असे म्हणत तिने सिरसाठ यांना रिक्षातून पैठणरोडकडे आणले.
लक्ष्मी मंदीराच्या जवळ रिक्षा थांबवत ति सिरसाठ यांना मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन आली. आजूबाजूचा कानोसा घेत दयाबाई ने सिरसाठ यांना हातातील अंगठ्या व कानातील सोन्याच्या बाळा काढून दे नाहीतर फेट्याने तुझा गळा आवळून जीवे मारीन अशी धमकी दिली. यावेळी सिरसाठ यांनी यास नकार देताच दयाबाईने त्यांना मारहाण करीत बळजबरीने बोटातील अंगठी काढून घेतली आणि कानातील सोन्याच्या बाळ्या ओरबडू लागली.
अचानक ओढवलेल्या या प्रसंगाने घाबरून जात सिरसाठ यांनी आरडाओरड केली, यावर दयाबाई त्यांना धक्का देत पळाली. मात्र ; सिरसाठ यांच्या आरडाओरड्याने लोक जमले व त्यांनी लागलीच दयाबाईला पकडले. याच दरम्यान गस्तीवरील पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. ही घटना सिडको ठाण्याच्या हद्दीतील असल्याने सिडको पोलिसांनी तिला तिला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक झुंजारे यांनी दिली.