औरंगाबाद : छावणी ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहायक फौजदारासह त्यांची पत्नी आणि मुलाला अश्लील एसएमएस पाठविणाऱ्या एका महिलेला सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी अटक केली.वेगवेगळ्या सीमकार्डवरून सतत अश्लील आणि घाणेरडे एसएमएस सहायक फौजदार आणि त्यांच्या कुटुंबियांना येत होते. ते एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याने त्यांनी या प्रकरणी अनोळखी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्रकरण तपासासाठी सायबर क्राईम सेलकडे आले. पोलीस निरीक्षक गौतम पातारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला तेव्हा पोलिसाच्या कुटुंबियांना ज्या मोबाईलवरून एसएमएस आले तो फिर्यादी फौजदाराच्याच नावे असल्याचे समोर आले.पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी सीमकार्ड खरेदीसाठी कोणासही कागदपत्रे दिले नसल्याचे सांगितले. एसएमएस पडेगाव येथील फिरदौस कॉलनीतून येत असल्याचे पोलिसांना टॉवर नेटवर्कवरून समजले. अधिक चौकशी केली असता तेथे राहत असलेल्या एका विधवा महिलेच्या तक्रारीचा तपास फौजदाराकडे होता. त्यावेळी त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली होती. तेव्हा तिला फौजदार आणि कुटुंबातील अन्य एका सदस्याचा मोबाईल नंबर माहीत झाला होता.दरम्यान, फौजदाराने मैत्री तोडून टाकल्याने महिलेस राग आला. याचा बदला घेण्यासाठी तिने सर्वांच्या मोबाईलवर अश्लील एसएमएस पाठविणे सुरू केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी तिला अटक केल्याचे पोलीस निरीक्षक पातारे यांनी सांगितले. ही कामगिरी सायबर क्राईम सेलचे कर्मचारी धुडकू खरे, नितीन देशमुख, रवी खरात, गणेश वैराळकर, रेवणनाथ गवळी, जयश्री पाटील आणि ज्योती भुरे यांनी केली.
अश्लील एसएमएस पाठविणारी महिला गजाआड
By admin | Published: June 19, 2014 12:37 AM