सिल्लोड : स्त्री जन्मापासूनच सामाजिक नियमांमध्ये अडकलेली असते. तिला अनेक बंधने येतात आणि मग तिच्या मनाची घुसमट ओव्यांतून, गीतातून बाहेर पडते. जात्यावरची गाणी आदी अनेक मार्गांतून ती आपली भावना व्यक्त करते. एक पत्नी, बहीण, आई असे अनेक भावभावनांचे पदर स्त्रीच्या आयुष्याला असतात. स्त्रीचं हे संपूर्ण आयुष्यच एक कविता असते, असे प्रतिपादन कवयित्री शैलजा कारंडे यांनी केले.
सिल्लोड येथे आयोजित ऑनलाईन ‘हिरकणी कवी संमेलनात’ त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी कवयित्री शैलजा कारंडे तर उद्घाटक म्हणून सिल्लोड शहर ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नालंदा लांडगे उपस्थित होत्या.
या कवी संमेलनात कवयित्री गीतांजली गजबे यांनी ‘शब्दांच्या या वाटेवरुनी चालत राहा’ ही कविता सादर करत स्त्रीच्या ममत्वाचे ओल दाखवत आपल्या कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कवयित्री गीता रायपुरे यांनी ‘तिच्या आतल्या रे कळा तुला’ ही कविता सादर केली. कवयित्री सुजाता दरेकार यांनीही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री गीतांजली गजबे यांनी केले. काव्यमैफल टीमचे गझलकार राजू आठवले यांनी आभार मानले. या कवी संंमेलनाच्या यशस्वितेसाठी बद्रीनाथ भालगडे, परवेज शेख, पवन ठाकूर, प्रशांत गायकवाड, सुनील भालगडे यांनी परिश्रम घेतले.