माजलगाव : तालुक्यातील लऊळ येथे १५ दिवसांपूर्वी महिलांनी अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त करून पोलिसांकडे दारुबंदीची मागणी केली होती. मात्र, याउपरही दारू विक्री सुरुच होती. शनिवारी पुन्हा एकदा महिलांनी आक्रमक पवित्रा घेत विक्रेत्यांच्या घरावर धडक दिली. पकडलेली दारू घेऊन महिला थेट ग्रामीण ठाण्यात पोहोचल्या.लऊळ हे साडेपाच हजार लोकसंख्येचे गाव असून गावात एकही अधिकृत दारू दुकान नाही. चोरीछुपे दारू विक्री सुरु आहे. त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, निर्धार सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सत्यभामा सौंदरमल यांनी लऊळ दारूमुक्त करण्यासाठी पदर खोचला. त्यांनी पंधरा दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन गावातील अवैध दारू निर्मितीच्या ठिकाणी छापासत्र राबविले. यावेळी दोन हजार लिटर गावठी दारू जप्त करुन भट्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर सौंदरमल यांनी ग्रामीण ठाण्याचे निरीक्षक सुरेश चाटे यांची भेट घेऊन लऊळमधील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती. दारू विक्री सुरुच असल्याचे कळाल्यावर सौंदरमल, दीपाली पाटील यांच्यासह इतर महिलांनी गावात जाऊन दारू विके्रेत्याच्या घरात जाऊन दारुच्या बाटल्या ताब्यात घेतल्या. सौंदरमल यांनी पकडलेल्या दारुच्या बाटल्या घेऊन ग्रामीण ठाणे गाठले. ठाण्याच्या दारात बाटल्या ठेवून त्यांनी ठिय्या दिला. दारूच्या बाटल्या आम्हाला सापडतात, तुम्हाला कासापडत नाहीत? असा संतप्त सवाल सौंदरमल यांनी केला. त्यावर चाटे यांनी आम्ही छापे टाकले होते. तेव्हा दारुच्या बाटल्या आढळल्या नव्हत्या असे उत्तर दिले. (वार्ताहर)महिला दारुच्सा बाटल्यांसह थेट ठाण्यात आल्याने पोलिसांची एकच धांदल उडाली. पोलीस प्रशासनाचे काम महिलांनी केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यावेळी निरीक्षक चाटे यांनी लगबगीने कर्मचारी पाठवून पंचनाम्याची कार्यवाही केली. उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. विक्रेत्यांची गय न करता कठोर कारवाई होईल, असे निरीक्षक चाटे म्हणाले.
दारुच्या बाटल्यांसह महिला ठाण्यात
By admin | Published: June 05, 2016 11:54 PM