औरंगाबाद : विम्याचे सात लाख रुपये मिळावे, यासाठी प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या सातवर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणीला वेदांतनगर पोलिसांनी गुरुवारी जिल्हा न्यायालय परिसरात पकडले. शिवाय तिच्याविरोधात तक्रार नोंदविणाऱ्या तिच्या आईच्या ताब्यात सातवर्षीय नातवाला दिले.
पतीच्या निधनानंतर दोन मुलांसह माहेरी राहणाऱ्या रूपाली (नाव बदलले) गतवर्षी प्रियकारासोबत पळून गेली होती. वर्षभर ती तिच्या बालकांकडे फिरकलीही नाही. दरम्यान, पतीच्या निधनानंतर विम्याचे सात लाख रुपये मिळावे, या उद्देशाने तिने मुलगा ताब्यात मिळावा, म्हणून आई-वडिलांविरोधात तक्रार नोंदविली होती. एवढेच नव्हे तर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तिचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने ९ मे रोजी रूपालीने (नाव बदलले) तिचा साथीदार राजू खोदूलाल रायकवार (रा. सिडको) याच्या मदतीने स्वत:च्या सातवर्षीय मुलाचे अपहरण केले होते.
याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला होता. गायब असलेली रूपाली ही गुरुवारी तिच्या मुलासह अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी कोर्टात आली होती. पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने रूपालीला कोर्टातून ताब्यात घेतले. तिच्या ताब्यातील सातवर्षीय मुलाला रूपालीच्या आईच्या ताब्यात दिले. आरोपी राजू रायकवार हा परप्रांतात पळून गेल्याचे समोर आले.