औरंगाबाद : डॉक्टरांनी गुडघ्यात असलेले पाणी काढल्यानंतर इंजेक्शन दिले. या इंजेक्शननंतर एका विवाहितेस तिव्र झटके आले. त्यातच मृत्यू झाल्याची खळबळाजनक घटना काल्डा कॉर्नर येथील रेजुवेन क्लिनीक येथे बुधवारी रात्री घडली. उपचार करताना डॉक्टरांच्या हलगर्जिपणामुळेच विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरावर गुन्हा नोंदविण्याची तक्रारही जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली.
शितल प्रद्मुम्न शिंदे (३२, रा.कानसुर, ता. पाथरी, जि. परभणी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मृत शितल यांना मागील दहा वर्षांपासून गुडघेदुखीचा त्रास होता. महिनाभरापासून दुखणे जास्त झाल्यामुळे त्या औरंगाबादेतील भावाकडे उपचारासाठी आल्या होत्या. त्यांच्या भावाने काल्डा कॉर्नर येथील रेजुवेन क्लिनिक येथील डॉ. अनुज भारुका यांच्याकडे तपासणीसाठी वेळ घेतला होता. त्यानुसार बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता शितल या भाऊ नंदकुमार पवार यांच्यासोबत दवाखान्यात आल्या. त्याठिकाणी डॉ. भारुका यांनी तपासणी केल्यानंतर गुडघ्यात वात असल्यामुळे पाणी झाले आहे. ते इंजेक्शन देऊन काढावे लागेल. पाणी काढल्यानंतर आणखी एक ईजेक्शन दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार डॉ. भारुका यांनी शितल यांच्या गुडघ्यातील पाणी काढुन ईजेक्शन दिले. ईजेक्शन दिल्यानंतर दोन मिनिटाच त्यांना तिव्र झटके आले. यातच त्या बेशुद्ध पडल्या.
डॉक्टरांनी त्यांना प्रेशर देऊन पाहिले. इतर मित्रांनाही बोलावून तपासणी केली. त्यानंतर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातुन घाटी रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या बहिणीचा मृत्यू झाल्याची तक्रारी भाऊ नंदकुमार पवार यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक निवृत्ती गायके करीत आहेत. दरम्यान, मृत्येचे कारण शोधण्यासाठी मृताचा व्हिसेरा प्रिझर्व्ह करुन ठेवण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.