सोयगाव: सततच्या नापिकी व विविध बॅंकेच्या कर्जाची फेड कशी करावी या नैराश्याने एका शेतकऱ्याच्या पत्नीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मंदाबाई मनोहर दांडगे असे मृत महिला शेतकऱ्याचे नाव आहे.
मंदाबाई मनोहर दांडगे यांच्या पतीच्या नावे डाभा शिवारातील गट क्रमांक ५ मध्ये शेती आहे. त्यांच्याकडे ग्रामिण बँक व बुलडाणा येथील बँक यांचे थकीत कर्ज आहे. शेतात सतत नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे यावरून घरात रोजच वाद होत असत. घरातील पाच ते सहा जणांचे जीवन शेतीवर आहे. शेतात उत्पन्न नाही, कोरोनामुळे रोजगार बुडाला, हातात काहीच नसल्याच्या आर्थिक विवंचनेत दांडगे कुटुंब होते.
नापिकीने आर्थिक तंगी, कर्ज फेडीसाठी बँकेचा नेहमीचा तकादा, शेती जप्ती होईल याची भीती, मुलाचे लग्न जुळत नसल्याची विवंचना यातून मंदाबाई दांडगे यांनी शनिवारी रात्री घरातील सर्वजण झोपेत असताना विहिरीत उडी घेत आपली जीवन यात्रा संपवली. रविवारी सकाळी मुलाने त्यांचा शोध घेतला असता विहिरीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पुढील तपास पीएसआय कासले व पो हवालदार बागुलकर रवींद्र करीत आहेत.