औरंगाबाद : स्वस्तात मिळणाऱ्या सोन्यासाठी महिला, तर कमी दरात शो रूममधील नवी वाहने मिळत असल्याने पुरुष मंडळी सुरेखा म्हेत्रे आणि निवृत्त उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांच्या आमिषाला बळी पडल्याचे समोर आले. या आरोपींकडून गंडविल्या गेलेल्या तक्रारदारांचे जबाब नोंदविण्यास पुंडलिकनगर पोलिसांनी सोमवारपासून सुरुवात केली.
२४ हजार रुपये प्रति तोळा सोन्याचे दागिने आणि होलसेल दरात वाहने आणि अन्य महागड्या वस्तू बचत गटामार्फत देण्याचे आमिष दाखवून गंडविल्याप्रकरणी सुरेखा मनाजी म्हेत्रे (४५,रा. पुंडलिकनगर) ही शनिवारपासून पुंडलिकनगर पोलिसांच्या कोठडीत आहे. सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता फसाटे आणि कर्मचारी आरोपी सुरेखा हिची कसून चौकशी करीत आहेत. या चौकशीत ती तिने ज्या लोकांकडून पैसे घेतले, त्यांना वस्तू दिल्याचे सांगत आहे. शिवाय ज्यांनी पैसे परत मागितले त्यांना त्यांची रक्कम दिल्याचाही दावा करीत आहेत. प्रत्यक्षात मोजक्याच लोकांना तिने वस्तू, दागिने आणि वाहने दिली. मात्र, उर्वरितांपैकी काहींना तिने दिलेले धनादेश अनादर केल्याचे तक्रारदारांनी सांगितले. गावंडे यांच्या आमिषाला बळी पडून पुंडलिकनगर येथील महिलांनी तिच्याकडे रोखीने आणि धनादेशद्वारे आणि आरटीजीएस करून कोट्यवधी रुपये दिले. आरोपी म्हेत्रे हिने सहा महिन्यांपासून सामान्यांना गंडविण्याचा उद्योग सुरू केला होता. सुरुवातीला तिने काही जणींना वाहने आणि सोन्याचे दागिने, पिठाची गिरणी आणि अन्य महागड्या वस्तू दिल्या. परिणामी, लाभार्थ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना सुरेखाच्या योजनेची माहिती दिल्याने त्यांनीही तिच्याकडे पैसे आणून दिले. आजपर्यंत ३० जणांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. सर्वांकडून तिला १ कोटी ७ लाख रुपये मिळाल्याचे तक्रारदार सांगत आहेत.
महिला दिनाचा मेळावा घेऊन केला फसवणुकीचा शुभारंभआरोपी म्हेत्रे हिने पुंडलिकनगर येथील गल्ली नंबर १० मध्ये तिच्या घरासमोर महिला दिनानिमित्त एक मेळावा घेतला. या मेळाव्याला केवळ महिलांनाच तिने आमंत्रित केले होते. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून तिचा पाठीराखा निवृत्त उपजिल्हाधिकारी गावंडे उपस्थित होते. या कार्यक्रमात तिने बचत गटामार्फत २४ हजार रुपये प्रति तोळा या दराने सोन्याचे दागिने आणि होलसेल दरात कोणतेही चारचाकी आणि दुचाकी वाहन, घरगुती वस्तू देण्यात येत असल्याचे नमूद केले.
राजस्थान, दुबईमधील सोनेकमी दरात सोन्याचे दागिने कसे देता, असे जेव्हा कोणी तिला विचारत तेव्हा राजस्थान आणि दुबईतून सोने ती आणून देते, असे सांगून विश्वास मिळवीत.