पाथरी (परभणी ) : तालुक्यातील वडी येथील एका गर्भवती महिलेस १०८ रुग्णवाहिकेतून पाथरी येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच प्रसूती होऊन महिलेने एका मुलीस जन्म दिला. माता आणि बालक दोघे सुखरूप आहेत.
आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिकच गतिमान झाली आहे. तात्काळ सेवा मिळत असल्याने अनेक दुर्घटना टळत आहेत. सोमवारी (दि. ३) दुपारी रुग्णवाहिकेला वडी येथून गर्भवती महिलेस प्रसूतीसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करायचे असल्याचा फोन आला. नंदिनी बाळू शिंदे (२८) यांना वादी येथून घेऊन रुग्णवाहिका गावाबाहेर निघाली असता नंदिनी यांना वेदना सुरू झाल्या. काही अंतरावर जाताच प्रसूती होऊन त्यांनी एका मुलीस जन्म दिला. डॉ. रामप्रसाद दिवटे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.