वाळूज महानगर : रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकर दुभाजकावर धडकून झालेल्या विचित्र अपघातात रिक्षातील महिला जखमी झाली. ही घटना मंगळवारी दुपारी जोगेश्वरी येथे घडली.
पाण्याने भरलेला टँकर (एमएच-०४, डीएस- ४७२१) मंगळवारी घाणेगावकडून जोगेश्वरीमार्गे औद्योगिक क्षेत्रात जात होता. दरम्यान, इरफान पटेल (३४) हे पत्नी रिझवाना (३२) व मुलगा सलमानसह रिक्षाने (एमएच-२०, ईएफ-५८३८) जोगेश्वरी येथे घराकडे जात होते.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास मातोश्री रमाई चौकात रिक्षाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टँकरने दुभाजकाला धडक दिली. यानंतर इरफान यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिझवाना पटेल या जखमी झाल्या. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, टँकरचालक घटनास्थळावरुन पळून गेला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी टँकरमधील पाणी रस्त्यावर सोडून दिले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
मोठी दुर्घटना टळलीभरधाव टँकर दुभाजकाला धडकल्याने टँकरचे समोरील दोन्ही चाके निखळले असून, डिझेलची टाकी व पाटे तुटले आहेत. टँकरचे चाक निखळले नसते तर टँकरची थेट रिक्षाला धडक बसली असती. व मोठी दुर्घटना घडली असती.