छत्रपती संभाजीनगर : विमानतळाच्या भिंतीलगतच्या झुडपांमध्ये उचलून नेताना महिलेने तिन्ही आरोपींचा जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे चिडलेल्या तिघांनी झाडाला हात बांधून तिच्यावर अत्याचार केले. जिवंत सोडल्यास ती तक्रार करेल या भीतीने तिचा निर्घृण खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आरोपी राहुल जाधव, प्रीतम ऊर्फ सोनू नरवडे आणि रवी गायकवाड हे तिघे महिलेवर पाळत ठेवूनच होते. राहुलने हत्या केलेल्या महिलेची काही दिवसांपूर्वी छेडही काढली होती. त्यास विरोध केल्यामुळे तिला धडा शिकविण्याच्या ईर्षेने राहुल पेटला होता. त्यासाठी त्याने प्रीतम ऊर्फ सोनू आणि रवीला सोबत घेतले. रविवारी दुपारी १ वाजता महिला चर्चमधून घरी जाण्यासाठी निघाल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी तिला विमानतळाच्या भिंतीच्या जवळ अडवले. तिने तिघांना झिडकारले. त्यामुळे भडकलेल्या तिघांनी तिला उचलून नेत तिच्याच ओढणीने हात झाडाला बांधले. तिच्यावर आळीपाळीने पाशवी अत्याचार केले. नराधम अत्याचार करीत असतानाही तिचा प्रतिकार सुरूच होता. जिवंत सोडल्यास ती घरी जाऊन आपली पोलिसात तक्रार करेल, त्यावरून गुन्हा दाखल होऊन अडचणी निर्माण होतील. त्यामुळे भिंतीला लागूनच ठेवलेले धारदार तीन दगड आणून तिच्या डोक्यात घालून हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी मंगळवारी घटनास्थळावरील हत्येसाठी वापरलेले दगड, कपडे, जप्त केले. त्याशिवाय वैद्यकीय तपासणीसाठी वेगवेगळे सॅम्पलही आरोपींचे घेण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ यांच्यासह तपास अधिकारी निरीक्षक गौतम पातारे हे पुरावे गोळा करीत आहेत.
पोलिसांचे पुराव्यांना प्राधान्य -डॉ. गुप्तामहिलेवर अत्याचारानंतर खुनाची घटना अतिशय निंदाजनक आहे. पोलिसांनी काही वेळातच आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींना शिक्षा होण्यासाठी सक्षम पुरावे जमा केले जात आहेत. या पुराव्याच्या आधारावर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचा प्रयत्न पोलिसांचा असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.