छत्रपती संभाजीनगर : वडिलांच्या संपत्तीसाठी भाऊ, बहिण आणि पत्नीने आईला डांबून ठेवल्याची तक्रार जवाहरनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जवाहरनगर पोलिस ठाण्यात धर्मेश सुरेश चौरसीया (रा. बीडबायपास) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते पत्नीपासून पाच वर्षापासून विभक्त राहतात. त्यांचा मोठा भाऊ राजेश चौरसीया हे त्रिमुर्ती चौकात राहतात. तर त्यांची आई स्नेहलता चौरसीया या वडिलांचे निधन झाल्यापासून त्रिमुर्ती चौक परिसरातच राहत आहे. फिर्यादीच्या वडिलाचे निधन झाल्यानंतर ते आईला खर्चासाठी पैसे देत होते. फोनवर बोलत होते. वडिलाच्या संपत्तीचा उपभोग फिर्यादीची पत्नी, भाऊ आणि बहिण हे घेत होते.
१ ऑक्टोंबर २०२१ रोजी फिर्यादी आईला भेटले. त्यानंतर दहा दिवसांनी आई मथूरा वृद्धांवन येथे गेली. त्यानंतर आईशी तीन महिने संपर्कात होतो. ३ डिसेंबर २०२१ पासून आईसोबतच संपर्क तुटला. तेव्हा आईबद्दल पत्नी, भाऊ आणि बहिणीकडे विचारपुस केली असता, त्यांनी माहिती दिली नाही. सर्वांनी माझा नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकला आहे. या तिघांनीच वडिलांच्या संपत्तीसाठी आईला डांबून ठेवल्याचे धर्मेश यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वसंत शेळके करीत आहेत.