फुलंब्री (औरंगाबाद) : तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील महिलांनी सोमवारी गावातील अवैधरीत्या विक्री होत असलेल्या दारूबंदी विरोधात एकजूट दाखवत ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. दारू बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देत महिलांनी येथे ठाण मांडला. या संदर्भात ग्रामसभेत विषय मांडून ठराव घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी मोर्चा मागे घेतला.
तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील लोकसंख्या २ हजार ३०० आहे. येथे गेल्या काही वर्षांपासून अनेक ठिकाणी अवैधरीत्या देशी, विदेशी दारूची विक्री करतात. यामुळे अनेक ग्रामस्थ दारूच्या व्यसनात अडकले आहेत. अनेकांचे संसार उजाडले. कौटुंबिक वाद वाढले, याला वैतागून महिलांनी पुढाकार घेत दारूबंदीसाठी रणशिंग फुंकले. आज सकाळी सर्व महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. दारू बंद करण्याच्या घोषणांनी गाव दणाणून गेले. दरम्यान, ग्रामसेविका आशा भावले यांनी मोर्चाला सामोरे जात लवकरच ग्रामसभा बोलावून या सभेत दारूबंदीचा ठराव घेण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर महिलांनी फुलंब्री पोलिसांना निवेदन दिले.
आंदोलनात जिजाबाई जगन्नाथ खंडाळे,भीमाबाई अप्पाराव केजभट, शांताबाई अंबादास सिरसाठ, हौसाबाई दामोदर वाहटूळे, चान्दुबाई प्रकाश पाचवने, चंद्रकलाबाई जनार्धन पाह्वाने, चंद्रकलाबी भागीनाथ वाहटूळे, वेणूबाई श्रावण लांडगे, अरुणा विजय खंडाळे, शीलाबाई वाळूबा सिरसाठ, भीमाबाई चंद्रभान वाहटूळे, सविता गणेश खंडाळे आदींचा सहभाग होता.