बीड : दिवसेंदिवस व्यसनाला आहारी जाणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत चालली आहे. याला कोठेतरी आळा बसावा म्हणून आजही लोक लढा देत आहेत. गावात दारूबंदी व्हावी यासाठी काही महिला आक्रमक होत थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे शनिवारी आल्या. गावात दारूचे दुकान थाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी या महिलांनी केली आहे.गेवराई तालुक्यातील गढी येथे लोकवस्तीतच एक नवीन दारूचे दुकान सुरू होणार आहे. यामुळे गावातील तरूण पिढीसह नागरिकही याच्या आहारी जावू शकतात. त्यामुळे याला आळा बसणे आवश्यक आहे, असे या महिलांचे म्हणने आहे.शाळा, महाविद्यालय, लोकवस्ती अशा वर्दळीच्या ठिकाणी दारूचे दुकान थाटणे हे अनाधिकृत असून यापासून अनेकांना त्रास होऊ शकतो, तसेच जे दुकान थाटणार आहे, त्या ठिकाणाहून दररोज महिला, तरूण, मुली, विद्यार्थीनी यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा ठिकाणी हे दुकान थाटल्यास तळीरामांकडून या महिला व मुलींना नाहक त्रास सहन करावा लागेल, असे या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.अशा वर्दळीच्या ठिकाणी थाटणार आहे दुकानज्याठिकाणी हे दारूचे दुकान थाटणार आहे, या परीसरात शाळा, महाविद्यालय, लोकवस्ती, राष्ट्रीय महामार्ग, बस थांबा यासारखी अनेक मुख्या ठिकाणे आहेत. त्यामुळे अशा सार्वजनिक ठिकाणी असे अवैध दारूचे दुकान थाटल्यास शांतता भंग होण्याची भीती येथील महिलांनी व्यक्त केली आहे. मागील काही दिवसांपासून येथे दुकान थाटण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र येथील महिलांनी सातत्याने याला लढा दिल्याने अद्यापपर्यंत दुकान थाटण्याचा डाव मोडून पाडला. महिलांच्या या लढ्याला गावातील इतर महिलांचे व पुरूषांचेही काही प्रमाणात सहकार्य आहे.तरूणांचे भविष्य धोक्यातया परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने येथे तरूणांची व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी हे दारूचे दुकान थाटले तर येथील तरूण दारूच्या आहारी जावू शकतात. त्यामुळे या दुकानाला स्थगीती द्यावी संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी सिंधू गोरे, रोहिणी गोरे, सुवर्णा गोरे, मंदुबाई ढाकणे, विमल सपकाळ, भाग्यश्री गोरे, कुसूम जाधव यांच्यासह वस्तीतील शेकडो महिलांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे. (वार्ताहर)
दारू दुकानाला महिलांचा विरोध
By admin | Published: September 20, 2014 11:24 PM