औरंगाबाद : दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन नागरिक व क्रांतीचौक पोलिसांनी सतर्कता दाखवत सेव्हनहिल उड्डाणपुलावरुन खाली उडी मारणाऱ्या विवाहितेला वेळीच पकडल्यामुळे तिचे प्राण वाचले. हा प्रकार गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडला. पोलिसांनी विवाहितेला धीर देत तिला पती व मुलाच्या सिडको पोलिसांच्या स्वाधिन केले.
झाले असे की, परभणी जिल्ह्यातील मजूर कुटुंब औरंगाबादेत कामाधंद्याच्या शोधार्थ आले आहे. सध्या झाल्टा फाटा झोपडपट्टी येथे राहतात. गुरुवारी दुपारी ही विवाहिता, तिचा पती व मुलगा सेव्हणहिल उड्डाणखाली होते. तेथे नवरा-बायकोत कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात ही विवाहिता अतिथी हॉटेलकडून उड्डाणपुलावर आली व कठड्यावर चढून तिने खाली उडी मारुन जीव देण्याचा विचार केला. ती पळत पळत आली व एकदम कठड्यावर चढली तेव्हा आकाशवाणीकडून सिडको चौकाकडे दुचाकीवर दोन नागरिक जात होते. त्यांच्या पाठीमागेच क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमोल देवकर, उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, जमादार मंगेश पवार, पोलीस नाईक नरेंद्र गुजर, जावेद पठाण, शिपाई संतोष रेड्डी, कृष्णा चौधरी हे जीपमधून कोविड लस घेण्यासाठी जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिला व सदरील महिला उडी मारणार तोच दोघा नागरिकांनी पकडून तिला मागे ओढले.
पोलिसांनीही तात्काळ वाहन थांबविले व तिला रोखत ताब्यात घेतले. पोलिसांनी तिला अगोदर पिण्यासाठी पाणी दिले. त्यानंतर तिची सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली. तेव्हा तिने कुटुंबासह परभणी येथून कामाधंद्यासाठी औरंगाबादेत आलो असल्याचे सांगितले. पतीसोबत वाद झाल्यामुळे रागाच्या भरात आपण उड्डाणपुलाच्या कठड्यावरुन उडी मारुन जीव देणार होते, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी समुपदेशन करून तिला पती व मुलाच्या ताब्यात दिले.