औरंगाबाद : मागील आठवड्यात मंगळसूत्र चोरांना धुमाकूळ घातला होता. चार घटना घडल्यानंतर पाच दिवसानंतर पुन्हा एकदा मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना आज समोर आल्या. कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. एका घटनेत अल्पवयीन आरोपी पोलिसांनी पकडला. दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वार मंगळसूत्र घेऊन पळून गेले. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाशनगर स्मशानभुमी परिसरात राहणाऱ्या राणी विनोद बताडे (वय ३९) या मंगळवारी रात्री ९.४५ वाजता दोन वहिणींसोबत कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी पायी चालत गेल्या होत्या. तीन जणी १०.३० वाजता परत येत असताना बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहचल्यावर पाठीमागुन दोन जण दुचाकीवर आले. महिलांच्या जवळ आल्यानंतर दुचाकीचा वेग कमी करीत पाठीमागे बसलेल्या एका चोरट्याने राणी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यात ९ ग्रॅम सोन्याचे ५० मणी आणि सोन्याचे पैडल चोरट्याच्या हाती लागले. अचानक घडलेल्या घटनेमुळे घाबरलेल्या महिलांनी आरडाओरड केली. त्यांच्या मदतीला कोणी येईपर्यंत चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेनंतर राणी बताडे यांच्या तक्रारीवरुन वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक अनिल कंकाळ करीत आहेत.
नाकांबदी करुन अल्पवयीन मुलगी पकडलीमुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपतीनगर मध्ये राहणाऱ्या शारदा बंडू जाधव या बुधवारी सकाळी सहकारी महिलांसोबत कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत एका अल्पवयीन मुलीने शारदा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर शारदा यांनी आरडाओरड केली. तेव्हा परिसरात तैनात असलेले छावणी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सचिन वायाळ, अंमलदार अयूब पठाण, गणेश वाघ, जमीर तडवी, अविनाश दाभाडे यांनी परिसराची नाकाबंदी केली. त्यात एका अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता, तिच्याकडे हिसकावलेले मंगळसूत्र आढळून आले. या प्रकरणी मंगळसूत्र मिळाल्यानंतर महिलेने तक्रार दिली नाही.