- विकास वत्सला पुंडलिक राऊतछत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदावर ६९ वर्षांत फक्त दोन महिला अधिकाऱ्यांना संधी मिळाली आहे. तर विभागीय आयुक्तपदावर आजवर एकाही महिला अधिकाऱ्याला संधी मिळालेली नाही. ८ मार्च जागतिक महिलादिनी स्त्री सक्षमीकरण, हक्क, न्यायाच्या समानतेच्या मुद्यावर परिसंवाद, चर्चासत्रे, भाषणे होतील. मात्र महिलांना समान हक्क मिळण्यासाठी नियमानुकूल संधी मिळण्यास केव्हा सुरुवात हा प्रश्न अनुत्तरीत राहील. अधिकारांच्या पदावर महिलांची नियुक्ती करण्याची वेळ येते तेव्हा शासकीय यंत्रणेत विविध कारणांमुळे संधी डावलण्यात येते. ही वस्तुस्थिती आगामी काळात बदलेल, अशी अपेक्षा आहे.
आजवर ४३ जिल्हाधिकारी१९५६ साली बी. एल. कुलकर्णी यांनी पहिले जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतला होता. विद्यमान जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत. त्यांच्यासह आजवर ४३ जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाले. त्यात २००१ ते २००४ या काळात व्ही. राधा या जिल्हाधिकारी होत्या. त्यानंतर २०१५ साली डॉ. निधी पाण्डेय यांना संधी मिळाली.
आजवर ३२ विभागीय आयुक्तआजवर ३२ विभागीय आयुक्त झाले. पहिले विभागीय आयुक्त म्हणून एम. आर. यार्दी यांनी १ नोव्हेबर १९५६ साली पदभार घेतला होता. आजवर ३२ जणांना विभागीय आयुक्त होण्याची संधी मिळाली. त्यात एकाही महिला अधिकाऱ्याचा समावेश नाही. मराठवाड्यात महसूल प्रशासनात १ हजार ५०० च्या आसपास महिला कर्मचारी-अधिकारी आहेत.
जिल्हा प्रशासनात १७२ महिला कर्मचारीजिल्हा प्रशासनात सर्व मिळून १७२ महिला कर्मचारी आहेत. यात अधिकारी पदावर ५ व इतर संवर्गात ३६ महिला कर्मचारी या मुख्यालयात कार्यरत आहेत. तर जिल्ह्यात ५ महिला अधिकारी असून १३८ इतर संवर्गातील महिला कर्मचारी आहेत. यात वर्ग-४, वर्ग-३, वर्ग-२ पदावर काम करणाऱ्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.