- बापू सोळुंके
औरंगाबाद : शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या १८ पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयात लवकरच सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी महिला दिनानिमित्त हा उपक्रम हाती घेतला.
याविषयी अधिक माहिती अशी की, शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक ते पोलीस कॉन्स्टेबल, अशा विविध पदांवर सुमारे साडेतीनशे ते चारशे महिला कार्यरत आहेत. यासोबतच पोलीस आयुक्तालाच्या कार्यालयीन कर्मचार्यांमध्येही महिला अधिकारी कर्मचार्यांची संख्या अधिक आहे. ड्यूटीवर असताना मासिक पाळी आलेल्या महिला सहकार्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणीच मोफत सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या आरोग्याला त्याचा लाभ होईल, अशी संकल्पना पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासमोर मांडली.
विशेष म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक ठाण्यात सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्याच्या त्यांच्या योजनेला पोलीस आयुक्तांनी तात्काळ मंजुरी दिली. आयुक्तांकडून हिरवा कंदिल मिळताच प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त अनिता जमादार आणि अन्य अधिकार्यांना बोलावून याविषयी कार्यवाही करण्याचे आदेशित केले. याविषयी बोलताना उपायुक्त म्हणाल्या की, महिला दिनानिमित्त सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन बसविण्याची संकल्पना पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आकारात येत आहे. याविषयी टेंडर प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेल्या महिला पोलीस अधिकारी-कर्मचार्यांसाठी हे आगळेवेगळे गिफ्ट ठरणार आहे.
महिला दिनानिमित्त विविध उपक्रममहिला दिनाच्या अनुषंगाने शहर पोलीस दलाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात महिला पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस कुटुंबातील महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात विशेषत: महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी केली जाणार आहे. शिवाय स्तनाचा कॅन्सर कसा ओळखावा, याविषयी तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. ‘बालमानसशास्त्र’ या विषयावर मार्गदर्शनासाठी दोन तज्ज्ञ डॉक्टरांना बोलाविण्यात आले. याशिवाय ‘गृहोद्योग आणि कर्जप्रक्रिया’ याविषयी एक व्याख्यान होईल. अन्य एक व्याख्यान ‘छोटी गुंतवणूक, मोठी बचत’ या विषयावर आयोजित करण्यात आले असल्याचे उपायुक्तांनी नमूद केले. लवकरच कार्यक्रमांची तारीख जाहीर केली जाणार आहे.