पैठण : कायद्याने महिलांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी सुरक्षा कवच प्रदान केले असून, मुली व महिलांनी मनात कुठलीही भीती न बाळगता निर्भयपणे जगावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पैठण येथे केले.पैठण पोलीस ठाण्यात मंगळवारी डॉ. आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महिला सक्षमीकरण व संरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस अधीक्षक मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड उपस्थित होते. संविधानाने महिलांना खूप हक्क दिले आहे, त्याची तुम्हाला माहिती व्हावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. मेळाव्यासाठी महिला दक्षता समितीच्या सदस्या अश्विनी लखमले, रेखाताई कुलकर्णी, पुष्पाताई गव्हाणे, शोभाताई निकाळजे,ज्योती काकडे, गिता पटेल, संध्याताई पारवे, सुमन राजळे, श्रुती निकम, अंजली शर्मा, अपर्णा हजारे, सायरा शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन उज्वला कुटे तर प्रास्ताविक पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी केले. आभार पो.कॉ. गणेश शर्मा यांनी मानले. महिलांना कुठल्याही कुचंबणेस वा गैरवर्तणुकीस सामोरे जावे लागत असेल तर पैठण पोलीस ठाण्यात वा माझ्याशी संपर्क साधावा, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
पैठण येथे महिला सक्षमीकरण मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:31 AM