वाळूज महानगर : पायाभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ वडगाव नवीन वसाहत भागातील संतप्त महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी संबंधित विकासक सुविधा देत नसल्याचा आरोप करुन ग्रामपंचायतीकडे सुविधा देण्याची मागणी केली. मात्र, कार्यालयात जबाबदार कोणीच नसल्याने महिला बराच वेळ बसून होत्या. अखेर पं.स. सदस्य राजेश साळे व माजी उपसरपंच सुनिल काळे यांनी महिलांची समजूत घालून घरी पाठविले.
वडगाव ग्रामपंचायत हद्दीत सिडको अधिसूचित क्षेत्रात अनेकांनी अनधिकृतरित्या भूखंड व घराची खरेदी-विक्री केली आहे. स्थानकि ग्रामपंचायतीने अनेकांची दप्तरी नोंद घेतली आहे. घरे व भुखंडाच्या विक्रीनंतर विकासकांकडून नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत. अनधिकृत वसाहत असल्याने ग्रामपंचायतीलाही निधी खर्च करुन सुविधा देणे शक्य नाही. पाणी, रस्ते, लाईटबरोबरच ड्रेनेजची मोठी समस्या आहे. ड्रेनेज व सांडपाणी जाण्यास मार्ग नसल्याने वरील गटनंबरचे ड्रेनेज व सांडपाणी खालच्या गटनंबरमधील वसाहतीत साचत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व डासाचा त्रास सहन करावा लागत आहे. गट नंबर ५ व १२ मधील नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यामुळे गट नंबर १२ मधील महिलांनी शुक्रवारी ग्रामपंचयात कार्यालयावर मोर्चा काढला.
यात ललिता देशमुख, वैशाली गायके, नागिन काळे, शारदा जाधव, मंदा काकडे, विजया कदम, कमल पाटील, मीरा कुंभारे, वंदना गवई,विमल गडदे, शोभा तम्मलवार, उषा गवळी, भारती दगडघाटे, मीनाक्षी भोसले, निर्गुणा बैनवाड, संगीता जाधव, शारदा बोधले, पुजा हासुळे, कल्पना गायकवाड, सविता मेंधळे, सपना कºहाळे आदींसह ४० ते ५० महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यालयात सरपंच, ग्रामविकास अधिकारी कोणीच जबाबदार नसल्याने महिलांनी सरपंचाच्या कार्यालयात ठिय्या मांडला. जवळपास अर्धा ते पाऊणतास महिला कार्यायाताच बसून होत्या. यावेळी पं.स. सदस्य राजेश साळे व माजी उपसरपंच सुनिल काळे यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन-तीन महिन्यांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे दोघांनी महिलांना सांगितले.
सुविधा पुरविणार कशा?सिडको अधिसूचित क्षेत्रात हा भाग येतो. अनधिकृतपणे भूखंड खरेदी करुन घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत व सिडको प्रशासन या भागात सुविधा पुरवू शकत नाही. त्यामुळे या भागात सुविधा पुरविणार कशा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.