लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व कलाविश्वाला वेगळा आयाम देणारा गणेशोत्सव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकमान्य टिळकांनी सामाजिक अभिसरणासाठी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात अधिक सामाजिक बदल घडविण्यासाठी आपणही पावले टाकायला हवीत.आपल्या आयुष्यात आई, आजी, बहीण, मुलगी, पत्नी यांचे कायमच जिव्हाळ्याचे स्थान असते. आपल्यासाठी ‘ती’ कधी गौरी असते, कधी आदिशक्ती तर अनेकदा ‘ती’ आपली आईही असते. स्त्रियांचा सन्मान करायलाच हवा. हा सन्मान गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगळ्या पद्धतीने व्हावा, ‘ती’चा अभिमान वाढावा आणि ‘ती’चा आनंद द्विगुणित होईल, असे आपल्या हातून काही घडावे, या हेतूने ‘लोकमत’ने गेल्या वर्षीपासून ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे.गणेशोत्सव फक्त पुरुषांनीच साजरा करावा, असा नियम नाही. त्यामुळे आपल्या ‘ती’ला त्यात मानाचे स्थान देऊया. ‘ती’ला गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचा, ‘ती’ला गणरायाची पहिली पूजा करण्याचा मान देऊन एका नव्या सामाजिक अभिसरणाच्या मोहिमेला सुरुवात करूया. टाटा टी गोल्ड मिक्स्चर व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या काळात ‘ती’चा गणपती हा उपक्रम गणेशोत्सवांतर्गत साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत गणपतीची प्रतिष्ठापना, ५ दिवस आरती, पूजा, महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. गणेशोत्सवामध्ये ‘ती’ला.. स्त्रीला महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमचे आपल्याला सस्नेह निमंत्रण आहे की, आपण सर्वांनी आमच्या ‘ती’चा गणपती मंडळाला भेट द्यावी. (फक्त महिलांनीच नव्हे तर पुरुषांनीदेखील येऊन दर्शन घ्यावे). लोकमत हॉल, लोकमत भवन (प्रवेश मागील गेटने) येथे हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.या उपक्रमात स्त्री शक्तीचा जागर विविध क्षेत्रांतील महिलांना सन्मानित करून करण्यात येणार आहे. तसेच दररोज शहरातील विविध क्षेत्रांतील महिलांच्या हस्ते आरतीही करण्यात येईल. वन मिनिट गेम शो, मराठी-हिंदी गीतांचा सुरेल नजराणा, अथर्वशिर्ष्य पठण, मोदक बनवा, रांगोळी इत्यादी स्पर्धांचेही भव्य आयोजन करण्यात येईल. यादरम्यान महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकता येतील. मोठ्या संख्येने महिलांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
‘ती’चा गणपती उपक्रमात महिलांना मिळणार मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:51 AM