औरंगाबाद : शहरातील दूध डेअरी येथील जागेत प्रस्तावित शासकीय महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या उभारणीसाठी निधीची तरतूदच झालेली नाही. त्यामुळे या रुग्णालयाची उभारणी रखडणार आहे. निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेला असून, पहिल्या टप्प्यातील निधी मिळताच या रुग्णालयाचे काम सुरू होईल, असे म्हणत राज्याचे आरोग्यसेवा आयुक्त तथा संचालक डॉ. अनुपकुमार यादव यांनीही राज्य शासनाकडे बोट दाखविले आहे.
डॉ. अनुपकुमार यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सामाजिक न्याय भवन येथे औरंगाबाद आणि लातूर विभागातील आरोग्यसेवेसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाबरोबर २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयास मंजुरी मिळाली; परंतु जागेअभावी या रुग्णालयाच्या उभारणीला काही केल्या मुहूर्त मिळाला नाही. महिला रुग्णालयाचा प्रारूप आराखडा मंजूर झालेला आहे. प्रकल्प किंमत (बजेट इस्टिमेट) मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आले आहे; परंतु अद्याप निधीची तरतूदच झालेली नाही. त्यामुळे या रुग्णालयासाठी नुसतीच प्रतीक्षा करावी लागत आहे. महिला रुग्णालयाविषयी विचारणा केली असताना लवकरच निधी मिळेल आणि काम सुरू होईल, असे डॉ. यादव यांनी सांगितले.
आढावा बैठकीस अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. सतीश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी आरोग्यसेवेतील लक्ष्य पूर्ण न करणाऱ्या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची डॉ. यादव, डॉ. पाटील यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
माता व बालविभागाचा अद्याप निर्णय नाहीदूध डेअरीच्या जागेवर महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याच परिसरात आता घाटी रुग्णालयाऐवजी २०० खाटांचे स्वतंत्र माता व बालविभाग (एमसीएच विंग) उभारण्याचे नियोजन सुरू आहे; परंतु एकाच ठिकाणी दोन्ही सेवा सुरू झाल्यास रुग्णांची गर्दी होईल. त्यामुळे हा विभाग कुठे उभारायचा यासंदर्भात संभ्रम निर्माण झालेला आहे. यासंदर्भात अद्याप काही निर्णय घेतलेला नाही, असेही डॉ. यादव यांनी सांगितले.
मिनी घाटी जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरूचिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयात २२० पैकी केवळ ८० खाटांद्वारे रुग्णसेवा दिली जात आहे.