औरंगाबाद : एसटी महामंडळाने मोठा गाजावाजा करून मध्यवर्ती बसस्थानकात हिरकणी कक्ष सुरू केला; पण समोर शिवनेरी बसचे प्रतीक्षालय आणि आतमध्ये हिरकणी कक्ष, अशी अवस्था आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना हा कक्ष सापडत नाही. परिणामी, बसस्थानकातील बाकड्यावर बसूनच तान्हुल्यांना दूध पाजण्याची वेळ मातांवर ओढावत आहे.
सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवासात महिलांना आपल्या तान्हुल्याला स्तनपान करण्यासाठी बसायला जागा मिळत नाही. अशा वेळी बाळाचे भुकेने हाल होतात. हे ओळखून ‘ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन नेटवर्क कौन्सिल’ (बीपीएनटी) यांच्या सूचनेवरून काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व एसटी बसस्थानकांत ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात आले. या कक्षात खुर्च्या व सतरंजी यांची सोय करण्यात आली. शहरात मध्यवर्ती बसस्थानकात शिवनेरी बसच्या प्रतीक्षालयाच्या आतमध्ये हा कक्ष आहे. प्रतीक्षालयात बसणाऱ्या प्रवाशांना हिरकणी कक्ष लक्षात येतो; परंतु बसस्थानकात, फलाटावर असलेल्या प्रवाशांना हिरकणी कक्ष दिसत नाही. कारण बाहेर केवळ प्रतीक्षालयाचा फलक आहे.
कक्षाविषयी जनजागृतीचा अभावस्तनदा मातांना आपल्या तान्हुल्यांना स्तनपान करता यावे, यासाठी बसस्थानकात हिरकणी कक्ष असतो, याविषयी अनेक महिला अनभिज्ञ असल्याचे दिसले. हा कक्ष कशासाठी आहे, हे आजपर्यंत माहीत नसल्याचे लक्ष्मी चव्हाण म्हणाल्या. तर या कक्षाची संकल्पा माहीत आहे. हा कक्ष बसस्थानकात सहज दिसून आला पाहिजे, असे वैशाली बिरारे म्हणाल्या.
२०१३ मध्ये सुरू केला कक्षतान्हुल्याला घेऊन बसस्थानकात येणाऱ्या महिलांसाठी मध्यवर्ती बसस्थानकात २०१३ मध्ये ‘हिरकणी’ या विशेष कक्षाची सुरुवात करण्यात आली; परंतु केवळ कक्ष सुरू करून एसटी महामंडळ मोकळे झाले. त्याविषयी बसस्थानकावर माहिती देण्याकडे, जनजागृती करण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
दर्शनी भागात फलक लावला जाईलबसस्थानकात अनेक वर्षांपासून हिरकणी कक्ष आहे. या कक्षासमोर शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय आहे. हिरकणी कक्षाची नियमितपणे स्वच्छता केली जाते. हा कक्ष सहज दिसून यावा, यासाठी दर्शनी भागात फलक लावला जाईल.- सुनील शिंदे, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक