औरंगाबाद : खेळण्या- बागडण्याच्या वयात काही लहान मुलांना रुग्णालये, ब्लड बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. जेवढा त्रास या मुलांना सहन करावा लागतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पालकांना. वारंवार आजारी पडणे, वजन न वाढणे, अशा एक नाही तर अनेक संकटांना थॅलेसिमियाग्रस्त मुले तोंड देतात. थॅलेसिमिया या आजाराला तोंड देणाऱ्या कुटुंबाचे जीवन जगणे असह्य होऊन बसते. अशाच काही कुटुंबांचे दु:ख कमी करण्याचा विडा शहरातील काही महिला संघटनांनी उचलला आहे.थॅलेसिमिया हा आजार जन्मताच होतो. तीन महिन्यांपर्यंत त्याची लक्षणे कळत नाहीत. या आजारात मुलांच्या शरीरातील रक्त कमी होत असते. त्यामुळे रुग्णाला बाहेरून रक्त द्यावे लागते. या सर्व औषधोपचारावर पालकांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. सुरुवातीची काही वर्षे अनेक पालक पोटच्या गोळ्याला दीर्घायुष्य मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न करीत असतात. नंतर आर्थिक परिस्थितीपुढे तेसुद्धा गुडघे टेकतात. अशा परिस्थितीत करावे तरी काय हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. शहरात अनेक कुटुंबे थॅलेसिमिया या आजाराचा मुकाबला करीत आहेत. शहरातील जायंटस् ग्रुप आॅफ सहेलीतर्फे मागील महिन्यात एका चिमुकल्या मुलाला एक वर्षासाठी दत्तक घेण्यात आले. त्यानंतर आता अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन आणि लायनेस ग्रुप आॅफ औरंगाबाद चिकलठाणा या दोन संघटनांनी मिळून दोन मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. दत्ताजी भाले रक्तपेढीतील डॉ. चव्हाण यांना दोन्ही मुलांच्या एक वर्षाचा खर्च म्हणून २४ हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला. यावेळी प्रकल्पप्रमुख माधुरी धुप्पड, अरुणा अग्रवाल, अ.भा. महिला संमेलनाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री बाफना, शाखा अध्यक्ष कांचन जैस्वाल, लायनेसच्या अध्यक्ष ललिता करवा, सुनंदा लाहोटी, जया खरे, माधवी करवा, सरला खिंवसरा, नंदा मुथा आदींची उपस्थिती होती.
चिमुकल्यांसाठी महिला संघटना सरसावल्या!
By admin | Published: September 08, 2014 12:19 AM