लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका आज पाणी देईल, उद्या देईल या आशेवर नागरिक जगू लागले. दोन-तीन वर्षे होत आले तरी पाणी येत नसल्याने नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. शनिवारी सकाळी वॉर्डात भाजपचे आ. अतुल सावे विकासकामांच्या उद्घाटनासाठी आल्यावर संतप्त महिलांनी त्यांच्यासमोर पाण्याचा माठ फोडून अभिनव पद्धतीने पाणी प्रश्न मांडला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सर्वच जण अवाक् झाले.पुंडलिकनगर पाण्याच्या टाकीपासून हाकेच्या अंतरावरील वॉर्ड म्हणजे गजानननगर होय. सर्वसामान्य गरीब, होतकरू नागरिकांच्या वसाहती या भागात आहेत.पोटाला चिमटे घेऊन नागरिकांनी आपल्या हक्काचा आशियाना येथे बांधून ठेवला आहे. संपूर्ण वॉर्ड गुंठेवारीत मोडतो. मागील दहा वर्षांत ब-यापैकी विकासकामेही झाली आहेत.यात आमदार आणि खासदार निधीचा बराच समावेश आहे. भारतनगर, गजानननगर आदी वसाहतींना मागील अनेक वर्षांपासून पाणी नाही.दोन वर्षांपूर्वीचे सेनेचे नगरसेवक आत्माराम पवार यांनी संपूर्ण वॉर्डाला पाणी पाजण्याचे ‘इंद्रधनुष्य’ पेलवले. समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराला पकडून वॉर्डात लाईन टाकण्यात आल्या. पाण्याच्या लाईन कोठे आणि कोणाच्या सोयीसाठी टाकल्या हे वॉर्डातील जाणकारांनाही चांगलेच माहीत आहे.खिशातील चार पैसे खर्च करून नागरिकांनी नळ कनेक्शनही घेऊन ठेवले. समांतरची कंपनीची अचानक हकालपट्टी करण्यात आली. महापालिका नवीन वसाहतींना पाणी देण्यास तयार नाही. त्यामुळे वॉर्ड क्र. ९४ गजानननगरचा पाणी प्रश्न रखडला आहे.शनिवारी महिलांनी पाण्यासाठी जोरदार आंदोलन केल्यानंतर या भागातील सेनेच्या नगरसेवकांने उलट महिलांना असे करायला नको होते असे सांगितले. पाणी हवे असेल तर वर्गणी करून पैसे जमा करा अशी मागणीही महिलांकडे करण्यात आल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, पाणीे प्रश्नावरून या भागातील राजकारण जोरदार तापले आहे.
आमदारासमोर फोडला माठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:47 AM