हिंगोली : तालुक्यातील हिरडी येथे पोलिसांनी महिलांची मदत घेऊन रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अवैध देशीदारू जप्त केली. मागील काही दिवसांपासून येथील परिसरात अवैध देशी व गावठी दारू छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हिरडी येथे अवैध देशीदारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती बासंबा पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचत गावातील एकाच्या घरी छापा टाकला व स्टीलच्या टाकीत लपवून ठेवलेल्या २१ देशीदारूच्या बाटल्या एकूण १ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पुरूषांनी मात्र दारू पकडण्यासाठी सहाकार्य केले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु महिला पुढे सरसावल्याने दारू पकडण्यास मदत झाली. याप्रकरणी पोना गणपत मस्के यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामदेव महादजी थोरात याच्याविरूद्ध दारूबंदी कायद्यातंर्गत बासंबा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई करणाऱ्या पथकात बीट जमादार कमरोद्दीन व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
महिलांच्या मदतीने छापा; अवैध देशीदारू जप्त
By admin | Published: February 21, 2016 11:52 PM