लातूर : मद्य प्राशन करून महिलांवर अन्याय, अत्याचार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने ‘दारूमुक्त महाराष्ट्र’ ही चळवळ उभी केली जाणार आहे. तसेच गावोगावी महिलांचे ‘ताईगिरी’ पथक निर्माण केले जाणार असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी आम्ही यापूर्वी आंदोलन केले आणि समानतेचा अधिकारही मिळाला, असे सांगून देसाई म्हणाल्या, मद्य प्राशनामुळे अन्याय, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दारूबंदी करण्याची सरकारची प्रबळ इच्छाशक्तीही नाही. त्यामुळे आता आम्ही हा विषय घेऊन उतरणार आहोत. सुरुवातीला पालकमंत्र्यांना जिल्हा बंदी करू, असेही त्या म्हणाल्या. दारू मुक्तीची चळवळ आक्रमक करण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाही मंत्रालयात कोंडवू. तसेच गावोगावी ‘ताईगिरी’ पथक निर्माण करून संरक्षणासाठी महिलांच्या हाती काठी देऊ, असेही त्या म्हणाल्या. आ. परिचारक यांनी काढलेल्या अपशब्दावर तीव्र संताप व्यक्त करीत त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचे निलंबन करणे महत्त्वाचे होते. आ. परिचारक यांना आम्हीच चोप देणार आहोत. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रत्येकाने मुलगा-मुलगी समान मानावा व त्याची आपल्यापासूनच सुरुवात करावी. तसेच महिलांच्या कपड्यासंदर्भात पुरुषांनी आपली मानसिकता बदलावी. शासनाने विद्यार्थ्यांना इयत्ता ७ वी पासून लैंगिक शिक्षण द्यावे, असेही त्या शेवटी म्हणाल्या.
अत्याचाराविरुद्ध महिलांची ‘ताईगिरी’
By admin | Published: March 11, 2017 12:18 AM