औरंगाबाद: वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या रसायनमिश्रीत पाण्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरे दगू लागल्याने संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी केलेल्या उपोषणाची दखल न घेतलेल्या महिलेने शुक्रवारी ( दि.१७ ) सायंकाळी शिवाजीनगर येथील जलकुंभावर चढून विरूस्टाईल आंदोलन केले. जवाहरनगर पोलिसांनी समजूत काढून तिला जलकुंभावरून खाली आणल्याने पुढील अनर्थ टळला.
शालू अर्जून भोकरे (रा.घाणेगाव) असे आंदोलनकर्त्या महिलेचे नाव आहे. राष्ट्रीय निवारा परिषदेच्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्या रसायन मिश्रीत पाणी नदी नाल्यात सोडत असतात. यामुळे परिसरातील विहिरी, नाले आणि नदीचे पाणी प्रदूषित झाले आहेत. रसायनयुक्त पाणी जमिनीत झिरपत असल्याने विहिरीसह बोअरवेलचे पाणीही पिण्यायोग्य राहिले नाही. रसायनयुक्त पाणी पिल्याने जनावरे दगावत असतात आणि माणसांना आंघोळीसाठीही हे पाणी वापरता येत नाही, यामुळे रसायनयुक्त पाण्याची योग्य विल्हेवाट न लावणाऱ्या कंपन्या बंद कराव्यात, आणि या कंपन्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, यामागणीसाठी शालू भोकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेक निवेदने दिली.
काही दिवसापूर्वी त्यांनी या कार्यालयासमोर उपोषण केले. मात्र त्याच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. यामुळे शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास त्या शिवाजीनगर येथील जलकुंभावर चढल्या. यामुळे जलकुंभाखाली नागरीकांनी गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि कर्मचाऱ्यांनी जलकुंभावर धाव घेतली. यावेळी सुरवातीला जलकुंभाच्या अर्ध्या पायऱ्या चढल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे पोलीस आंदोलनकर्त्या भोकरे यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र त्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. असे असताना सपोनि वायदंडे या त्यांच्याशी बोलत, बोलत जवळ गेल्या आणि त्यांनी त्यांचा हात पकडला. यानंतर अन्य पोलिसांनी त्यांना घेरले. यानंतर त्यांची मागणी काय आहे, हे जाणून घेतले. समजूत काढल्यानंतर भोकरे यांना जलकुंभावरून खाली उतरवून पोलीस ठाण्यात नेले.