घाटनांद्रा : पूर्वी बैलाच्या किंवा मनुष्याच्या मदतीने लाकडी घाण्यावर उसाचा रस काढण्याचा व्यवसाय ग्रामीण भागात दिसत होता. आज ग्रामीण भागातून लाकडी घाणे लुप्त झाले असून यंत्राच्या साहाय्याने उसाचा रस काढला जात आहे. विशेष बाब म्हणजे, उसाच्या रसाची चव या यंत्रामुळे बदलली आहे.
लाकडी घाण्यातून काढला गेलेला रस शुद्ध व चवदार असायचा. मात्र, यांत्रिक युगात मानवी व लाकडी घाण्याची जागा आता आधुनिक यंत्रसामग्रीने घेतली आहे. दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. या उकाड्यापासून शरीराला थंडावा मिळावा यासाठी सर्वांची पावले आपसूकच रसवंतीकडे वळू लागली आहेत. परंतु, लाकडी घाण्यावरून काढलेल्या रसामध्ये जो स्वाद होता. तो स्वाद या यंत्रावरून काढलेल्या रसाला येत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळू लागली आहे. मात्र, जीवाची होणारी लाहीलाही थांबविण्यासाठी यंत्रातूनही निघालेला रस प्यावाच लागतो. एके काळी ग्रामीण भागातील सर्वाधिक खपाचे शीतपेय म्हणून ओळखला जाणारा उसाचा रस बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या शीतपेयांमुळे मागे पडलेला दिसत आहे.
ठिकठिकाणी रसवंत्या थाटल्या
उन्हाळा सुरू होताच तालुक्याच्या ठिकाणासह अनेक महत्त्वाच्या गावांत रसवंत्या थाटल्या जातात. विद्युत मोटारीवर चालणाऱ्या यंत्रावर उसाचा रस काढला जातो. कमी जागेत हे यंत्र बसले जात असल्याने व्यावसायिकांना त्याचा फायदा होतो. थंड शीतपेयांच्या किमतीच्या तुलनेत रस पिणे अधिक परवडत असल्याचे ग्राहकांचे मत आहे.
शीतपेयांमुळे रसवंतीकडे कल कमी
सध्या काळाच्या लाकडी घाणा लुप्त होताना दिसत आहे. पूर्वी या घाण्यावर खुळखुळ्याचा वापर होत असायचा. यामुळे ग्राहकांना हे खुळखुळे आकर्षित करून उसाच्या रसाकडे येण्यास भाग पाडायचे. उन्हाळ्यात याला प्रचंड मागणी असते. मात्र, आज वेगवेगळी शीतपेये बाजारात उपलब्ध असल्याने उसाच्या रसाची मागणी काहीअंशी कमी होऊ लागली आहे.
माणिक मोरे, रसवंतीचालक.
दोन फोटो : घाटनांद्रा येथे आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे रस काढताना रसवंतीचालक तर दुसरीकडे लुप्त होत चाललेला उस काढण्याचा लाकडी घाणा.