फुलंब्री : तालुक्यातील वाघलगाव येथे तीर्थक्षेत्र विकास योजनेतील मंजूर झालेले काम निश्चित ठिकाणी न करता दुसऱ्याच ठिकाणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जि. प. सदस्य शिवाजीराव पाथ्रीकर यांनी केली आहे.
वाघलगाव येथे प्रसिद्ध मारोती मंदिर आहे. या मंदिराचा २०१७-१८ मध्ये तीर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये समावेश करण्यात आला होता. या योजनेंतर्गत मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ता व मंदिराला संरक्षक भिंत बांधण्यासाठी १९ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. यातील काही कामे जिल्हा परिषद सदस्यांना माहिती न देता मनमानी पद्धतीने करण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे.
मारोती मंदिराला मंजूर असलेली संरक्षक भिंत मंदिराच्या पाठीमागून बांधणे आवश्यक असताना ही भिंत दुसरीकडे बांधण्यात आली आहे. हे काम होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून लपविण्याचा प्रयत्न सुरू होता.
चौकट...
बिले काढली कशी
तीर्थक्षेत्र विकास योजनेतील होत असलेले काम चुकीच्या ठिकाणी होत असल्याची माहिती संबंधित कनिष्ठ अभियंत्याने वरिष्ठांना कळविले होते. असे असताना त्या कामाचे १० लाखांचे बिल कसे काढण्यात आले? या बिलासाठी कोणी शिफारस केली? या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणी तक्रार करूनही जि.प. अधिकारी लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे.
कोट...
वाघलगाव येथील झालेले काम एका ठिकाणी मंजूर असताना दुसऱ्या ठिकाणी करण्यात आले आहे. या कामात घोळ झालेला असताना बिल का काढण्यात आले? याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- शिवाजीराव पाथ्रीकर, जिल्हा परिषद सदस्य