औरंगाबाद : समृद्धी महामार्गाला नांदेडपर्यंत जोडण्यास इन्फ्रा कमिटीने मान्यता दिली आहे. डीपीआरचे काम सुरू झाले असून ते पूर्ण झाले की पुढील निर्णय होईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांना सांगितले. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महामार्गावरून शिर्डीपर्यंत ३१ मे २०२१ पर्यंत वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे काम ग्रीनफिल्डमधून होईल. विद्यमान रस्त्याला नांदेड जोडले जाणार नाही. नव्याने भूसंपादन करावे लागेल. यासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली आहे. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. याप्रसंगी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आदी आमदारांची उपस्थिती होती.
पूजा चव्हाण प्रकरणात काय म्हणाले?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजप नेते तुटून पडले आहेत. यावर शिंदे म्हणाले, झालेली घटना दुर्दैवी आहे, विषय संवेदनशील आहे. खात्री आणि पुराव्याशिवाय कुणाचेही नाव एखाद्या प्रकरणात जोडणे योग्य नाही. माहिती घेऊनच यावर भाष्य करीन. सरकारमधील अनेक मंत्र्यांवर आरोप होत आहेत. यावर शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले काम केले आहे. तारेवरची कसरत सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.
संभाजी महाराजांच्या नावाबाबत केंद्राला आकस नाही
संभाजीनगर हा मागील अनेक वर्षांपासूनचा मुद्दा असून ती जनभावना आहे. शिवसेनाप्रमुखांची ती भूमिका होती, त्यानुसारच मुख्यमंत्रीही जनभावनेसोबतच आहेत. संभाजीनगर या नावाला विरोधाचे काही कारण नसून तो अस्मितेचा मुद्दा आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण होईल. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. महापालिका निवडणुका आणि नामकरण अशा राजकीय हेतूने निर्णय होणार नाही.
विमानतळ नामकरणासाठीही केंद्राशी पत्रव्यवहार झाला असून तो निर्णय लवकर होईल. विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्यास केंद्र शासनाचा काहीही आकस नाही. केंद्राने सहकार्य केले पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.