घाटीच्या स्वच्छतागृहात पाण्याचा ठणठणाट
औरंगाबाद : घाटीतील सर्जिकल इमारतीसमोर असलेल्या स्वच्छतागृहात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. याठिकाणी पाण्याच्या सुविधा देण्याकडेच दुर्लक्ष करण्यात येत आहे. शिवाय अस्वच्छतेमुळे रुग्ण, नातेवाईकांना दुर्गंधीचाही त्रास सहन करावा लागत आहे. याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसराची दुरवस्था
औरंगाबाद : घाटीसमोरील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय परिसराची दुरवस्था झाली आहे. कार्यालयाच्या आवारात जागोजागी मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. झाडीझुडपीही वाढली आहे. याकडे लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
रुग्णांना भेटण्याच्या वेळेकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना ठराविक वेळेत प्रवेश दिला जातो. परंतु आजघडीला त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नियोजित वेळेनंतरही रुग्णांचे नातेवाईक वाॅर्डांमध्ये जात आहेत. त्यामुळे सर्जिकल इमारतीत कायम गर्दी राहत आहे.
कोटला कॉलनीत रस्त्यावर खड्डे, खड्ड्यांत सांडपाणी
औरंगाबाद : समर्थनगरकडून कोटला कॉलनीकडे जाताना रस्त्यावरील खड्डे आणि खड्ड्यांत साचलेल्या सांडपाण्याचा वाहनचालकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. सिमेंट रस्ता असून जागोजागी खड्डे पडले आहेत. याकडे महापालिकेने लक्ष देऊन खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.