कामाला लागा; काँग्रेसला बहुमत मिळवून द्या : अशोकराव चव्हाण यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:49 PM2018-01-31T13:49:34+5:302018-01-31T13:53:07+5:30
काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली.
औरंगाबाद : काँग्रेसच सरकार चालवू शकते, ही पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. आगामी २०१९ च्या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसा, जोशात कामाला लागा आणि काँग्रेसला बहुमत मिळवून द्या, अशी साद मंगळवारी काँग्रेस प्रशिक्षण शिबिराद्वारे नेत्यांनी घातली.
सागर लॉन्सवर दिवसभर हे शिबीर चालले. प्रारंभी, प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी आजच्या राजकारणाचे वास्तव मांडले व सरकारवर टीकेची झोड उठवली. तत्पूर्वी मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांनी दीप प्रज्वलित केले. ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावर डॉ. रत्नाकर महाजन यांनी मांडणी केली व नरेंद्र मोदी यांचा उल्लेख गॉड फादर करीत तो कसा हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे, याकडे लक्ष वेधले.२०१९ च्या निवडणुकीत या हुकूमशाही प्रवृत्तीचा, झुंडशाहीचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांनी ‘उपेक्षित मागासवर्गीयांबद्दल काँग्रेसची भूमिका’ या विषयावर विवेचन केले. उपहासगर्भ आणि विनोदी शैलीतील भाषणात त्यांनी मोदींच्या भाषणशैलीची नक्कल केली. शांताबाई या गाण्याच्या चालीवर ओळी सादर केल्या. उपेक्षित मागासांसोबत काँग्रेस सतत राहत आली आहे, हे सांगत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे किती फायदे होत आहेत, हे सांगितले. काँग्रेसचे सोशल इंजिनिअरिंगचे धोरण स्वीकारण्याचे आव्हान त्यांनी केले.
महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांचे हिंदीतून जोशपूर्ण भाषण झाले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची कशी अधोगती होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पतंजलीचाच एक दिवस मोठा घोटाळा उघडकीस येईल, अशी शक्यता अभिजित सपकाळ यांनी सोशल मीडियाच्या सादरीकरणातून व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस सरकार सहकार चळवळीच्या कसे मुळावर उठले आहे, याचे सुंदर विवेचन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. देशाची आर्थिक परिस्थिती या विषयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश पाडला व अच्छे दिन म्हणण्याने नव्हे तर विकास दर किती वाढला हे महत्त्वाचे असते, हे त्यांनी पटवून दिले. आज लोकांशी संवाद वाढवण्याची गरज आहे. लोकांच्या मनात असंतोष आहे. तो जागवण्याची गरज आहे. कारण कोणताही वर्ग आज खुश नाही. यांनी काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा केली; पण ५६ भाजप आल्या तरी देश काँग्रेसमुक्त होऊ शकणार नाही, असे उद्गार विखे पाटील यांनी काढले. विधान परिषदेतील उपसभापती माणिक ठाकरे यांचेही यावेळी भाषण झाले. श्याम उमाळकर, आ. अब्दुल सत्तार आणि डॉ. पवन डोंगरे यांनी शिबिराच्या कामकाजाचे सूत्रसंचालन केले. मंचावर वरिष्ठ पदाधिका-यांची उपस्थिती होती.
क्षणचित्रे :
- या शिबिराच्या निमित्ताने अलीकडच्या काळातील कार्यकर्त्यांचे अशा पद्धतीचे एकत्रीकरण पहिल्यांदाच पाहावयास मिळाले. त्यातही एक गणवेश व डोक्यावर गांधीटोपी हे चित्र शिस्तीचे दर्शन घडवत होते.
- सकाळी १०.०५ ही ध्वजारोहणाची वेळ होती; पण प्रत्यक्षात १०.५० वा. प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व नंतर सेवादलाने त्यांना सलामी दिली.
- एका भल्या मोठ्या हारात सामावून घेऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मंचावरील पदाधिकारी, वक्ते व नेत्यांच्या गळ्यात काँग्रेसचे तिरंगी उपरणे झळकत होते.
- अभिजित सपकाळ यांचे सोशल मीडियावरील सादरीकरण प्रशिक्षणार्थींना खूपच भावले. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी काय काय आश्वासने दिली होती व नंतर ते त्यापासून कसे दूर गेले, हे सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांना टाळ्यांची दाद मिळत गेली.
- आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. त्यांना व धुळे जिल्ह्यातील शहीद शेतकरी धर्मा पाटील यांना यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
- शिबिराच्या शेवटी, अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते स्वागत करून पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या ५३ व बहुजन क्रांती दलाच्या १०४ कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. शहर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष बाबा तायडे व त्यांच्या सहका-यांनी हा प्रवेश घडवून आणला.