लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वच ग्राहकांना स्वस्त वीज आणि दर्जेदार सेवा पाहिजे. अलीकडे वीजनिर्मिती व वितरण क्षेत्रात खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत. अशा परिस्थितीत आपणास स्पर्धेत टिकायचे असेल, तर तांत्रिक, अतांत्रिक अधिकारी, कर्मचाºयांना आपली कार्यक्षमता वाढवावी लागेल. कार्यपद्धतीत बदल करावा लागेल. त्याचवेळी आपले अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.शनिवारी तापडिया नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरणच्या विविध समस्यांवर तांत्रिक-अतांत्रिक कर्मचाºयांसोबत व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांचा थेट संवाद, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, कार्यकारी संचालक शंकर शिंदे, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता सुरेशचंद्र अग्रवाल यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा होते.संजीव कुमार म्हणाले, खाजगी कंपन्या या क्षेत्रात उतरल्या असून, या स्पर्धेत महावितरणचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी तुम्हाला अंग झटकून कामाला लागावेच लागेल. नाही तर महावितरणची मक्तेदारी संपुष्टात येण्याचे दिवस दूर नाहीत. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. नवीन वीज कनेक्शनसाठी ग्राहकांना चकरा मारायला लावू नका. ग्राहकांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करा. आपला सेवा देणारा व्यवसाय आहे. आपण व्यवसायाच्या तत्त्वाचे पालन केले नाही, तर व्यवसाय बंद पडण्यास वेळ लागणार नाही, असा धोकाही त्यांनी बोलून दाखवला. यावेळी प्रादेशिक सहसंचालक ओम प्रकाश बकोरिया म्हणाले की, लाइनमनची सुरक्षा ही आमची टॉप प्रायोरिटी असेल. त्यांना सुरक्षा उपकरणांचा पुरवठा केला जाईल. समन्वयाने काम करा. सप्टेंबर अखेरपर्यंत घराघरापर्यंत जाऊन मीटरविषयक तक्रारींचे निराकरण करावे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी केले.
स्पर्धेमुळे झपाटून कामाला लागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:51 AM