औरंगाबाद : येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी गांधी भवनात केले.
गांधीभवन येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, औरंगाबाद शहर हे आता मोठे शहर बनले आहे; परंतु २५ वर्षांपासून मी तोच पाण्याचा प्रश्न आणि जलवाहिनीचा प्रश्न ऐकतोय. आता कुठेतरी हे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महापालिकेवर संधी मिळाली पाहिजे. मी हे नांदेड महापालिकेत करून दाखविले आहे. औरंगाबादेतही हे शक्य आहे. गरज पडेल त्यावेळी मदत करण्यास मी तत्पर राहीन. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या मन:स्थितीत आपल्या नेत्या सोनिया गांधी नव्हत्या; परंतु महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची गरज असल्याचे आम्ही त्यांना पटवून दिले. त्या बैठकीला मी स्वतः होतो. त्यानंतर सोनिया गांधी यांनी या सत्ता स्थापनेला मान्यता दिली, हेही चव्हाण यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, प्रदेश पदाधिकारी अशोक सायन्ना, प्रकाश मुगदिया, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश नारनवरे आदींची भाषणे झाली. डॉ. पवन डोंगरे व नीलेश आंबेवाडीकर यांनी सूत्रसंचालन केले, हमद चाऊस यांनी आभार मानले.