औरंगाबाद : शहरातील ९ ऐतिहासिक दरवाजांना गतवैभव मिळवून देण्यासाठी संवर्धन व सुशोभिकरण स्मार्ट सिटीच्या निधीतून वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले. आता ही कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. काही कामे ८० टक्क्यापर्यंत पूर्ण झाली आहेत.
शहरातील ऐतिहासिक दरवाजांची दुरवस्था झाल्याने महापालिकेने नऊ दरवाजांचे संवर्धन व सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महापालिकेच्या निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही कामे स्मार्ट सिटीकडे वर्ग करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या निधीमुळे कंत्राटदाराने निविदाप्रक्रियेला प्रतिसाद दिला. त्यानंतर इंटेक या कंपनीला प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यात आले. प्रकल्प व्यवस्थापक म्हणून स्नेहा बक्षी या काम पाहत आहेत. ३ कोटी २० लाख रुपये खर्चून ही कामे केली जात असून, मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे कामामध्ये अडचणी आल्या. असे असले तरी सध्या ही कामे प्रगतीपथावर आहेत. सर्व दरवाजांचे काम तर ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. दरम्यान, काला दरवाजाचे काम अद्याप सुरू झालेले नाही ते पुढील आठवड्यात सुरू होईल. महेमूद गेटचे तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. अहवाल आल्यानंतर येथील कामे सुरू होतील. मागील आठवड्यात एका ट्रकने दरवाजाला धडक दिली होती. दरवाजांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर कायमस्वरूपी विद्युतरोषणाई, माहितीफलक लावले जाणार आहेत.
गेटची सुरू असलेली कामे
नौबत गेट- ६० टक्के, खिझरी गेट- ८० टक्के , जाफर गेट- ८५ टक्के , पैठण गेट - ७० टक्के , रोशन गेट- ८० टक्के , कटकट गेट - ७० टक्के , बारापुला गेट- ६० टक्के , शाहगंज घड्याळ टॉवर- ६५ टक्के.