औरंगाबाद : कोरोना मानधन, विमा सुरक्षा आदी मागण्यांसाठी सोमवारी घाटीतील इंटर्न (आंतरवासिता) डाॅक्टरांनी काळ्या फिती लावून काम करीत शासनाचा निषेध केला. कोरोनामुळे मृत्यू पावलेले लातूर येथील इंटर्न डाॅ. राहुल पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून इंटर्न डाॅक्टरांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
घाटीतील मेडिसीन विभागाच्या परिसरात सोमवारी दुपारी एकत्र येत इंटर्न डाॅक्टरांनी डाॅ. राहुल पवार यांना आदरांजली वाहिली. कोरोना रुग्णांची सेवा करत असूनही इंटर्न डाॅक्टरांना कोणतेही मानधन मिळत नाही. शिवाय विमा सुरक्षाही मिळालेली नाही. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका इंटर्न डाॅक्टरला जीव गमवावा लागला. शासनातर्फे कोणतेही विमा कवच नसल्यामुळेच या कोरोना योद्ध्याच्या उपचारासाठी वर्गणी जमा करावी लागली. शेवटी मोलमजुरी करणाऱ्या त्याच्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला, असे इंटर्न डाॅक्टरांनी नमूद केले. शासनाने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, इंटर्न डाॅक्टरांना मानधन आणि विमा सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंटर्न डाॅक्टरांनी काळ्या फिती लावून काम केले.
फोटो ओळ...
कोरोनामुळे मृत्यू पावलेले इंटर्न डाॅ. राहुल पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना घाटीतील इंटर्न डाॅक्टर.