गंगापूर : तालुक्यातील मुख्य लाईफ लाईन असलेल्या कायगाव ते देवगाव या ५७ कोटी खर्चाचे व ३७ कि. मी. रस्त्याचे होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी तक्रार माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी बांधकाममंत्र्यांकडे केली होती. या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
रस्त्याच्या कामामध्ये कंत्राटदारांकडून मातीवरच खडी, डांबर टाकून रस्ता तयार केला आहे. शिवाय, पूर्वीच्या खराब रस्त्यावर कुठलेही खोदकाम व स्वच्छता न करता सरळ डांबरमिश्रीत हलक्या दर्जाच्या खडीचा लेअर टाकून रस्त्याचे काम करण्यात आले. निविदेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या रस्त्याच्या परिसरात कुठेही डांबर प्लांट कंत्राटदाराने उभारलेले नाही. सार्वजनिक बांधकामचे स्थानिक उपअभियंता हरीसिंग ठाकूर व व संबंधित कंत्राटदार हे संगनमताने अतिशय कमी दर्जाचे साहित्य वापरून काम करीत असून केवळ सरकारी पैशाचा गैरव्यवहार करीत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाचे दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मुंबई येथील कार्यासन अधिकारी सु. दि. पास्टे यांनी औरंगाबाद येथील सा. बां. चे अधीक्षक अभियंता यांना या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.