वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथे दीड कोटी रुपये खर्चातून टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईनचे काम दहा महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेकडून संबंधित ठेकेदाराकडे खुलासा मागविण्यात आला आहे. तर दुसरीकडे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
वडगावचा गंभीर बनलेला पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी दशकभरापूर्वी पेयजल योजना राबविण्यात आली. मात्र, तीसगावच्या पाझर तलावात पाणी नसल्यामुळे ही योजना वांझोटी ठरली आहे. तत्कालीन सरपंच महेश भोंडवे व पदाधिकाºयांनी गावात एमआयडीसीकडून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीचे पाणी गावात आणण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून बजाजगेट जवळील एमआयडीसी जलकुंभ ते वडगाव जलकुंभापर्यत जलवाहिनी टाकलेली आहे.
मात्र, मूळ गावासह फुलेनगर व छत्रपतीनगर भागातील पाईपलाईन खराब झाल्याने या भागात एमआयडीसीची पाणी पुरवठा होत नाही. गावात सर्व वार्डांत सुरळीत शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधीही जिल्हा परिषदसमोर उपोषणही केले होते. यानंतर ग्रामपंचायतीने वंचित असलेल्या वसाहतीत पाणी पुरवठा करण्यासाठी अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचा गतवर्षी मार्च महिन्यात घेतला होता.
नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी १४ व्या वित्त आयोग निधीतून १ कोटी ५३ लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एमआयडीसीच्या जलकुंभापासून मूळ गाव, फुलेनगर, छत्रपतीनगर अशी जवळपास २० कि़मी. अंतर्गत लोखंडी जलवाहिनी टाकण्यासाठी मे. पटेल कन्स्ट्रक्शन या खाजगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून जलवाहिनी टाकण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही.
ठेकेदाराला खुलासा सादर करण्याचे आदेशजि.प. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता डोंगरे यांनी मे.पटेल कन्स्ट्रक्शनला १८ जानेवारीला गटविकास अधिकाºयाकडे आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश बजावले होते. मात्र संबधित ठेकेदार हजर न झाल्याने तसेच लेखी म्हणणेही सादर केले नाही. त्यामुळे डोंगरे यांनी ठेकेदारास नोटीस बजावली आहे. या विषयी सरपंच उषाताई साळे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराने तात्काळ काम सुरु न केल्यास नवीन निवीदा काढुन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.