सोयगाव : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी रविवारीही महसूल व कृषी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. दिव्यांग असलेले जरंडी सजाचे तलाठी अमित गंगावणे यांनीदेखील पंचनाम्याच्या कामासाठी शेतशिवार गाठले.
सोयगाव तालुक्यात चारही मंडळांत अतिवृष्टी झालेली आहे. यामध्ये खरिपाची कपाशी, बाजरी, ज्वारी, सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांना फटका बसलेला आहे. तहसीलदार रमेश जसवंत यांच्या नेतृत्वाखाली रविवारीही व गणगौरीच्या आगमनाच्या दिवशीदेखील अधिकारी, कर्मचारी शेतशिवारावर दिसून आले. एकाच दिवसात ७० हेक्टरवरील बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. ५२ गावांमध्ये २४६ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्याचे काम वेगात सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिव्यांगावर मात करीत तलाठी शेतशिवारात
जरंडी सजाचे दिव्यांग तलाठी अमित गंगावणे यांनी आपल्या अपंगत्वाची पर्वा न करता थेट डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतशिवारात जाऊन बाधित क्षेत्राचे पंचनामे करून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी कृषी विभागाच्या कर्मचारी आरती बाविस्कर यांचा सहभाग होता. त्यांनी जरंडी, निंबायती आणि धिंगापूर शिवारातील नुकसानीची पाहणी केली.
120921\img-20210912-wa0092.jpg
सोयगाव-अपंगत्वावर मात करत तलाठी धावून आला शेतकऱ्याच्या संकटात