निधोना-पोखरी परिसरात स्वतंत्र विद्युत उपकेंद्र उभारले जावे, यासाठी निधोना गावातील शेतकऱ्यांकडून सात वर्षांपासून शासनाकडे मागणी केली. सातत्याने होत असलेल्या मागणीनंतर २०१८ मध्ये त्याला मंजुरी मिळाली. त्यासाठी निधोना शिवारात असलेल्या सोनारी फाटा समोरील पोखरी शिवारातील एक एकर जमीन ग्रा. पं. ने महावितरणकडे वर्ग केली. त्यामुळे कामाला सुरूवात झाली; मात्र दिवसेंदिवस साहित्याच्या किमतीत वाढ होत असल्याने दोनदा उपकेंद्राच्या कामाची निविदा काढण्यात आल्या. त्यामुळे नोव्हेंबर २०१९ मध्ये काम सुरू झाले; मात्र मध्येच कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. त्यामुळे सबस्टेशनच्या कामावरील परराज्यातील कामगार येऊ न शकल्याने मजुराअभावी काम संथगतीने सुरू आहे.
या विद्युत उपकेंद्रातून निधोना, नायगाव, सोनारी असे तीन फीडर कार्यान्वित होणार आहेत. येथून विद्युत प्रवाह चालू झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना विजेच्या लपंडावापासून सुटी होणार आहे. त्यामुळे या उपकेंद्राचे काम कधी पूर्ण होईल याकडे शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.