औरंगाबाद : शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गंत सोमवारी जायकवाडीपासून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोरील यशवंतनगर येथून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता किरण पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून यंत्राचे पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली.
शासनाने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत योजनेचे काम सुरू आहे. योजनेच्या डिझाईननुसार जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २४०० मिमी. व्यासाचे पाईप टाकले जात आहेत. हे विशाल पाईप नक्षत्रवाडी येथील डोंगरावरच तयार करण्यात आले. लांबलचक ट्रेलवर एकाचवेळी एक पाईप नेण्यात येत आहेत. योजनेला गती देण्याचे आदेश मागील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने युद्धपातळीवर पाईप टाकण्याचे काम सुरू केले.
७.५ मीटर लांब आणि ८.५ मीटर व्यासाच्या अवाढव्य पाईपची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोटिंगचे काम हाती घेण्यात आले. कोटिंगची त्रयस्थ संस्थेने तपासणी केली. त्याचा अहवाल अहवाल प्राप्त होताच मुख्य जलवाहिनीचे पाईप पैठणकडे रवाना केले जात आहेत. दोन दिवसांत सहा पाईप पाठविण्यात आले आहेत. पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर असलेल्या यशवंतनगर येथून मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. यावेळी मनपाचे अधिकारी, पीएमसीचे अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. पोकलेन आणि जेसीबीच्या साह्याने खड्डे खोदून पाईप टाकले जात असल्याचे कंपनीचे मुख्य अधिकारी निर्णय अग्रवाल यांनी सांगितले.