लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील रेल्वेस्थानकावर अनेक असुविधा झाल्या असून, वेळोवेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे़ मात्र विकास कामे सुरू होत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे परभणीत प्रवाशांची हेळसांड होत आहे़परभणी रेल्वेस्थानक हे नांदेड विभागातील मोठे रेल्वेस्थानक असून, या ठिकाणाहून दररोज सुमारे १५ हजार प्रवासी प्रवास करतात़ मागील सहा महिन्यांपासून रेल्वे स्थानकावरील असुविधांमध्ये भर पडली आहे़ रेल्वे प्रशासनाच्या आदर्श रेल्वे स्थानकात समावेश असलेल्या परभणी येथील विकास कामे ठप्प असून, ही कामे सुरु होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे़परभणी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सध्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ परभणी ते मिरखेलपर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर या समस्यांमध्ये भर पडली़ दुहेरी मार्गावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर औरंगाबाद, मुंबईकडे जाणाºया सर्व गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबविल्या जात आहेत़ मात्र या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात असुविधा आहेत़विशेष म्हणजे, परभणीहून औरंगाबाद, मनमाड, मुंबईकडे जाणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि याच प्रवाशांना असुविधांचा सामना करावा लागतो़ पिण्याच्या पाण्याची सुविधा या ठिकणी उपलब्ध नाही़ तसेच स्वच्छतागृह, बसण्यासाठी आसन व्यवस्था या मुलभूत सुविधाही उपलब्ध नसून प्लॅटफॉर्मवर पोझीशन बोर्ड लावलेले नाहीत़ त्यामुळे आरक्षित डबा नेमका कुठे येणार? असा प्रश्न प्रवाशांना पडतो़ आरक्षण केल्यानंतर प्रवाशांना त्यांचा कोच क्रमांक व सीट क्रमांक मिळतो़ हा क्रमांक माहीत असतानाही रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांना धावपळ करीत जागा पकडावी लागते़ रेल्वे प्रशासनाने या ठिकणी किमान पोझीशन बोर्ड बसवून प्रवाशांची असुविधा दूर करावी, अशी प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़पादचारी पुलाचा प्रश्नही प्रलंबित आहे़ रेल्वे मार्ग दुहेरीकरणानंतर पादचारी पुलाचा वापर वाढला आहे़ महिनाभरापूर्वी मुंबई येथे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होवून २२ प्रवाशांना प्राण गमवावा लागला होता़परभणीतील पादचारी पूलही अरुंद आहे़ या ठिकाणी मोठा पादचारी पूल उभारण्याची आवश्यकता आहे़ त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवाशांना पादचारी पूल ओलांडून जाताना तारेवरची कसरत करावी लागते़या ठिकाणी लिफ्ट, एक्सलेटर मंजूर असताना ते अद्याप बसविले नाही़ त्याचप्रमाणे इतर अनेक समस्या निर्माण झाल्या असून, त्याकडे रेल्वे प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
परभणी रेल्वेस्थानकावरील कामे ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:58 PM