लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील मालमत्तांची संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी अधिकारी झपाटून कामाला लागले आहेत. जिल्हास्तरावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तालुकास्तरावर गटविकास अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या असून, या समित्यांनी आतापर्यंत अनेक बैठका घेतल्या. अनेक जागांचा शोधही घेतला आहे. तथापि, यापुढे मालमत्तांची जबाबदारी एकट्या उपअभियंत्यावर न ठेवता ज्या विभागाची जागा असेल, त्या विभागावर सदरील जागेची कागदपत्रे अद्ययावत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची कागदपत्रे अद्ययावत करण्यास गती मिळाली आहे.जिल्हाभरात जि.प.च्या आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम, शिक्षण, सिंचन, अंगणवाड्या आदी विभागांच्या जागा तसेच जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेल्या शहरातील अनेक जागा आहेत; परंतु त्यापैकी काही जागांवर स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केलेआहे.जिल्हा परिषदेची जेवढी मालमत्ता आहे, त्यापैकी अनेक मालमत्तांची कागदपत्रे जिल्हा परिषद प्रशासनाकडे नाहीत. काही जागा कवडीमोल भावाने भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत, याचेही रेकॉर्ड जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाही. जिल्हा परिषदेचे शहराच्या मध्यवर्ती भागात खुले मैदान आहे. कोट्यवधी रुपयांची ती मालमत्ता आहे. मात्र, ती जागा खाजगी मालकीची असल्याचा दावा एकाने केल्यामुळे ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांच्या सूचनेनुसार अधिकाºयांनी मालमत्तांचा केवळ शोधच नाही, तर त्यांची कागदपत्रे मिळविण्याचे मिशन हाती घेतले आहे.पहिल्या टप्प्यात मोकळ्या जागांचा शोध घेण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यात किती मोकळ्या जागा आहेत. त्यावर कुठे कुठे अतिक्रमण झाले आहे. त्या जागेची कागदपत्रे नसतील, तर ती हस्तगत करण्यावर भर देण्यात आला आहे. अर्थात या जागेची नोंद असलेले ४१ क्रमांकाचे रजिस्टर अद्ययावत करण्यास सुरुवात झाली आहे.
जि. प.च्या मालमत्ता होणार अद्ययावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:59 AM