- विजय सरवदे
औरंगाबाद : मार्चमध्ये लागू झालेल्या लॉकडॉऊनच्या पहिल्या टप्प्यात समृद्धी महामार्गाचे काम काही प्रमाणात प्रभावित झाले होते. आता मात्र महामार्गाच्या कामाने गती घेतली असून, जिल्ह्यात हे काम आॅगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.
डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाले. जिल्ह्यातून ११०.३०७ कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग जाणार आहे. बांधकामाच्या दृष्टिकोनातून औरंगाबादचे पूर्व आणि पश्चिम, असे विभाजन करण्यात आले असून, आतापर्यंत औरंगाबाद पूर्व विभागात ३१ टक्के, तर औरंगाबाद पश्चिम विभागात ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. आणि लार्सन अँड टुब्रो या दोन कंत्राटदार संस्था काम करीत आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये तीन महिन्यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्गाच्या कामावर थोडा परिणाम झाला होता. आंतरराज्य वाहतूक थंडावल्याने कामाचा वेग थोडा मंदावला होता. स्टील आणि सिमेंटची वाहतूक थांबली होती; परंतु गेल्या महिनाभरात कामाने आता पुन्हा वेग घेतला आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या १८ हजार कामगारांपैकी ४ हजार स्थलांतरित कामगार मे महिन्याच्या अखेरीस त्यांच्या मूळ गावी निघून गेले. आता प्रकल्पाच्या कामावर परतण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.
पुलकुंडवार म्हणाले की, समृद्धी महामार्ग प्रकल्प हा पूर्णपणे ग्रीनफील्ड प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे काम शहरापासून दूर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आताच्या लॉकडाऊनचा कोणताही परिणाम प्रकल्पाच्या कामावर जाणवत नाही, तसेच कोरोना काळात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली. तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करूनच प्रकल्पाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात संपूर्ण रस्त्याचे दररोज १५० मीटर असे काम पूर्ण होत आहे. समृद्धी महामार्गाच्या एकूण ७०१ कि.मी. लांबीपैकी ५०० कि.मी. लांबीचे काम मे २०२१ पर्यंत पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२१ पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा राज्य रस्ते विकास महामंडळाचा प्रयत्न आहे.
माळीवाडा येथील इंटरचेंज प्रगतिपथावर औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी, माळीवाडा व हडस-पिंपळगाव या ठिकाणी इंटरचेंज घेण्यात आली आहेत. त्यापैकी माळीवाडा येथील इंटरचेंज प्रगतिपथावर आहे व सावंगी, हडस-पिंपळगाव येथील इंटरचेंजची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय मनमाड-सिकंदराबाद रेल्वे लाईनवर लासूर येथील ‘आरओबी’च्या कामासाठी रेल्वे खात्याची परवानगी प्राप्त झाली असून, ते काम सुरू करण्यात आलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कामे आॅगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
जिल्ह्यात तीन नवनगरांची उभारणीसमृद्धी महामार्गालगत २० नवनगरांची उभारणी केली जाणार असून, औरंगाबाद जिल्ह्यात हडस पिंपळगाव, बाबतारा आणि घायगाव या तीन ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे अर्थात नवनगरे विकसित केली जाणार आहेत, तसेच महामार्गावर फ्लायओव्हर, व्हायाडक्ट, मोठे पूल, लहान पूल, पादचारी व पाळीव प्राण्यांसाठीचे, लहान वाहनांसाठीचे भुयारी मार्ग, फूड मॉल, ट्रॉमा केअर सेंटर, ट्रक टर्मिनल, बस बे इत्यादींचीही उभारणी केली जाणार आहे.